सावन वैश्य / नवी मुंबई : ‘नशा मुक्त नवी मुंबई ‘ या अभियाना अंतर्गत पोलिसांनी कारवाई करून, जप्त केलेले 26 कोटी 84 लाख रुपयांचे अंमली पदार्थ, नवी मुंबई पोलिसांनी तळोजा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट येथे नष्ट केले आहेत. यावेळी आमदार मंदा म्हात्रे, सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, गुन्हे शाखेचे उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक आयुक्त अशोक राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निगडे, यांसह मुंबई वेस्ट मॅनेजमेंटचे अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई शहरातील युवा पिढी नशेच्या आहारी जाऊन त्यांचे आयुष्य उध्वस्त होऊ नये, यासाठी नवी मुंबई पोलिसांनी नशा मुक्त नवी मुंबई ही मोहीम उभारली. या मोहिमेच्या जनजागृतीसाठी मोठमोठे दिग्गज व सुप्रसिद्ध अभिनेत्यांना बोलवण्यात आले. याच जनजागृती सोबत नवी मुंबई पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कारवाईचा धडाका सुरू केला. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अमली पदार्थ विरोधी कारवाईच्या सक्त सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत कमी किमती पासून ते लाखो करोड रुपयांचे अंमली पदार्थ हस्तगत केले होते. या कारवाईत अनेक आरोपींना अटक करून त्यांना गजाआड केले. यामध्ये परदेशी आरोपींचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. नवी मुंबई परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या 103 आफ्रिकन नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. तर त्यातील 96 जणांना देशातून हद्दपार करण्यात आले आहे. उर्वरित आरोपींवर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलंय.
सन 2023 ते 2025 या एक वर्षात नवी मुंबई पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कारवाई करून, तब्बल 1 हजार 613 गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये 2 हजार 754 आरोपींना अटक करण्यात आली असून, 26 कोटी 84 लाख रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी हस्तगत केले आहेत. जप्त केलेले अमली पदार्थ उपस्थित मान्यवर व अधिकाऱ्यांच्या समोर तळोजा एमआयडीसीतील बॉम्बे वेस्ट मॅनेजमेंट या ठिकाणी नष्ट करण्यात आले आहेत.
नशा मुक्त नवी मुंबई करण्यासाठी याच्या मुळावर घाव घालणे गरजेचे आहे. यासाठी आणखी कठोर कायदे करण्याचं बोललं जात होतं. मागील अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाल्यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा अमली पदार्थांची तस्करी अथवा विक्री करणाऱ्या टोळ्यांवर, मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कारवाई करत नवी मुंबई पोलिसांनी अमली पदार्थांची विक्री व तस्करी करणाऱ्या दिघ्यातील नाईक परिवारातील 7 तर ठाण्यातील त्यांचा सहकारी अशा एकूण 8 जणांवर मकोका गुन्ह्यांअंतर्गत कारवाई केली होती.