सावन वैश्य/ नवी मुंबई : पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत करंजाडे सेक्टर 7 परिसरात सख्ख्या भावाने भावाचाच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे ही गंभीर घटना घडल्यानंतर केवळ एका तासाच्या आत पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या बिट मार्शल पथकाने प्रसंगावधान दाखवत आरोपीला ताब्यात घेतले.
25 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वाजता 112 या नंबर वरून मिळालेल्या माहितीनुसार बिट मार्शल 05 चे पोलीस अंमलदार पोलीस हवालदार विलास कारंडे व पोलीस हवालदार राजेंद्र केणी हे अवघ्या दोन मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. दोघांनीही घटनास्थळी विचारपूस केली असता, मयत हा दत्तू काळे असल्याची माहिती मिळाली. उपस्थित नागरिकांकडून अधिक माहिती घेऊन बीट मार्शल विलास कारंडे आणि राजेंद्र केणी दोघांनीही नागेश वाल्या काळे हा पळून जाण्याच्या तयारीत असतानाच, त्याला राहत्या घराच्या परिसरातून अवघ्या एक तासात ताब्यात घेतल आहे.
प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. मृत दत्तु वाल्या काळे याचे चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. म्हणून डोक्यात दगड घालून त्याचा खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.या प्रकरणी दत्तु काळे यांचा मुलगा दिपक याच्या फिर्यादीवरून पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 570/2025 भा.दं.वि. कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी नागेश काळे यास अटक करण्यात आली आहे.