नवी मुंबईत गुन्हेगारीला बसणार आळा, पोलिसांनी सुरु केले "सायबर सेफ नवी मुंबई ऑफिशियल" यूट्यूब चॅनेल
सावन वैश्य ,नवी मुंबई: नवी मुंबई पोलीसांकडून आता सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारीला आळा बसणार असून लोकांमध्ये जनजागृती होणार आहे. त्याचे कारण म्हणजे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने स्वतःचे youtube चॅनल चालू केले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत सायबर सेफ नवी मुंबई ऑफिशियल या youtube चॅनेल ची सुरुवात करण्यात आली आहे. या चॅनलच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना विविध सायबर गुन्ह्यांबाबत माहिती देऊन जागृत केले जाते, तसेच 8828 – 112 – 112 हा हेल्पलाइन नंबर देखील सुरू करण्यात आला आहे.
21 व्या शतकातील आधुनिक शहर म्हणून नवी मुंबईकडे पाहिले जाते. कारण या टेक्नोसावी शहरात आशिया खंडातील सर्वात मोठी एपीएमसी बाजारपेठ, ठाणे बेलापूर औद्योगिक पट्टा, अंतरराष्ट्रीय कंपन्यांचे मोठमोठे आयटी पार्क, अत्याधुनिक यंत्रणांवर काम करणाऱ्या लहान मोठ्या आस्थापना आहेत. याच माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जग हे माणसाच्या हातात आल्याचे पाहायला मिळतं. एका क्लिकवर जगातील विविध घडामोडींबद्दल माहिती आपल्याला मोबाईलवर पाहायला मिळते. याच माहिती व तंत्रज्ञानाच्या जोरावर भारताने प्रगती केली आहे. मात्र या माहिती तंत्रज्ञानाचा वापर काही समाजकंटक नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यासाठी करत आहेत.
याबाबतच्या बातम्या आपण प्रसार माध्यमात पाहतो व वाचतो, या सर्वांवर आळा बसावा यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून व्हाट्सअप चॅनेल, इंस्टाग्राम, फेसबुक व एक्स (X) हॅण्डल हे यापूर्वीच सुरू केले होते, व याद्वारे सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यात येत होती. यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन सायबर गुन्ह्यांचा वाढता आलेख रोखण्यात नवी मुंबई पोलिसांना यश मिळाले होते. मात्र काही अंशी अजूनही फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यावर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय मार्फत सायबर सेफ नवी मुंबई ऑफिशियल हा youtube चॅनेल सुरू करण्यात आला आहे.
सायबर गुन्हेगार हे नवनवीन कल्पना शोधून तसेच नागरिकांना घाबरवण्याच्या वेगवेगळ्या शक्कल लढवून सावध हेरतात, व नागरिकांची फसवणूक करून लुबाडतात. लुबाडण्यात आलेली रक्कम ही लाखोंच्या घरात तर कधी कधी करोडोंच्या घरात देखील असल्याने आणखी नागरिक या फसवणुकीचे शिकार होऊ नये यासाठी आठव्यातील एक दिवस विविध विषयावरील तज्ञ व्यक्ती या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून जनतेसोबत थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबईत येण्यापूर्वी मुंबईत गुन्हे शाखेचे सह आयुक्त म्हणून काम पाहिले होते. कोरोना काळात सूत्र हाती घेतल्यावर सायबर गुन्ह्यांनी डोके वर काढायला सुरुवात केली होती. त्या गुन्ह्यातील गुन्हेगारांचा अनुभव तसेच आरोपी ज्या आधुनिकतेप्रमाणे गुन्हे करतात तशाच प्रकारे कायद्याने कृती करून गुन्हेगारांसारखं आधुनिक होऊन गुन्ह्यांवर आळा घालून गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळण्यात आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात यश आले आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे नवी मुंबई पोलिस आयुक्तालय हे पोलीस विभागाचे youtube चॅनल सुरु करणारे राज्यातील पहिले पोलीस घटक आहेत. नवी मुंबई पोलिसांचे सर्व अधिकृत चॅनेल्स नागरिकांनी सबस्क्राईब व फॉलो करून नागरिकांच्या जागरूक करण्याच्या पोलिसांच्या या कामास हातभार लावण्याचे आवाहन नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केले आहे.