
Navi Mumbai Kalyan Connectivity: नवी मुंबई–कल्याण प्रवास लवकरच सुलभ; ऐरोली–कटाई उन्नत मार्ग अंतिम टप्प्यात
Navi Mumbai Kalyan Connectivity: नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली प्रवास होणार सुलभ होणार आहे. कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई या भागांतून प्रवास करणाऱ्या लाखो वाहनचालक आणि प्रवाशांसाठी दिलासा मिळणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबईत महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) उभारण्यात येत असलेला ऐरोली- कटाई उन्नत मार्ग आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या प्रकल्पाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वाहतुकीसाठी कधी खुला होईल याची सर्व आतुरतेने वाट पाहत आहेत. कल्याण-डोंबिवलीहून नवी मुंबईत जाण्यासाठी सध्या रस्ते मार्गे किमान दीड तासाचा कालावधी लागतो.
या प्रकल्पातील बोगदा ४-४ मार्गिकांचा असून तो ऐरोली ते डोंबिवलीजवळील कटाई नाक्यापर्यंतचा प्रवास वेगवान करणार आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर ऐरोली परिसरातील जड वाहनांची वाहतूक कमी होईल. मुंबईहून कल्याणकडे जाणारी तसेच कल्याणकडून मुंबईकडे येणारी वाहने थेट या उन्नत मार्गाचा वापर करू शकतील. परिणामी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, वेळ, इंधन आणि प्रवाशांचा त्रास वाचणार आहे, एमएमआरडीएचा हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशाच्या वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ऐरोली-मुंब्रा प्रकल्पाचा विस्तार म्हणून मुंब्रा-कटाई नाका उन्नत मार्ग उभारण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. हा मार्ग देसाई खाडीवरून जाणार असून थेट आणि जलद संपर्कासाठी पारसिक डोंगरातून भुयारी बोगदा तयार करण्यात आला आहे. २०१८ मध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ठाणे-बेलापूर मार्ग ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ असा ३.४८ किमी लांबीचा उन्नत मार्ग उभारण्यात येत आहे. दुसऱ्या टण्यात ऐरोली पुलापासून ठाणे-बेलापूर मार्गावरील भारत बिजलीपर्यंत जोड रस्ता तयार करण्यात येणार आहे. एकूण ६.७१ किमी लांबीचा हा मार्ग देसाई खाडी ओलांडणार आहे.