
ओव्हरटेकचा प्रयत्न जीवावर बेतला; ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
कराड : विंग-धोंडेवाडी रस्त्यावर भीषण अपघात झाला. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर टॅालीखाली सापडून एकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एकजण जखमी झाला. गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सेवानिवृत्त शिक्षक हिंदुराव तातोबा पाटील (वय 75, सध्या रा. आगाशिवनगर, मलकापूर, ता. कराड) असे मृ्त्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत हिंदुराव पाटील मित्रासमेवत दुचाकीवरून क्रमांक (MH-50 G-9133) नातेवाईकाला भेटण्यासाठी विंग-धोंडेवाडी मार्गाने चालले होते. समोर ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरला क्रमांक (MH-50 C-2178) ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांची दुचाकी घसरली. दुचाकीवर मागे बसलेले हिंदुराव पाटील ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडले. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने ते जागीच मृत्यू झाला. तर यात दुचाकीस्वार आनंदा कांबळे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कराडच्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेदेखील वाचा : दु:खद! विरुद्ध दिशेने कंटेनर आला अन् बाप-लेकाला थेट…; कुठे घडला धक्कादायक अपघात?
दरम्यान, माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक धनंजय पाटील व सहाय्यक फौजदार विठ्ठल खाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कराडला हलवण्यात आला. घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. याप्रकरणी चालकावर उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ येथील फुलावर विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर गाडीने समोरील दुचाकी चालकाला उडवले. या भीषण अपघातात इंदापूर तालुक्यातील बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. खंडु नारायण बनसुडे (वय ३५)व रूद्र खंडु बनसुडे (वय दोघेही रा. पळसदेव ता. इंदापूर जि. पुणे) या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला.