जायकवाडी धरणावर ड्रोन उडवणे पडले महागात! (Photo Credit- Ai)
दहशतवाद विरोधी शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की, एका इसमाने पैठण येथील नाथसागर जलाशय परिसरात बेकायदेशीररीत्या ड्रोन उडवून चित्रीकरण केले असून त्या दृश्यांपासून तयार केलेल्या ‘रील्स’ सोशल मीडियावर प्रसारित केल्या आहेत. या माहितीच्या आधारे सहायक पोलिस निरीक्षक दिनकर गोरे व त्यांच्या पथकाने संबंधित व्यक्तीच्या इन्स्टाग्राम खात्याची तपासणी केली.
तपासादरम्यान मनोज राजेंद्र देहाडे (२६, रा. पडेगाव) याने १५ मार्च २०२६ रोजी आपल्या ‘धुरंधर बाईक रायडर’ या ग्रुपसोबत नाथसागर येथे जाऊन अनधिकृतपणे ड्रोनद्वारे चित्रीकरण केल्याचे उघड झाले. नाथसागर जलाशय व त्याभोवतीचा पाच किलोमीटरचा परिसर हा नागरी विमान वाहतूक महासंचालनालय तसेच महाराष्ट्र राज्याच्या अपर पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार ‘रेड झोन’ अर्थात प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे.
या परिसरात ‘नो ड्रोन झोन’चे फलक लावलेले असतानाही कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता चित्रीकरण करण्यात आले. सदर प्रकरणात संबंधिताने जिल्हाधिकारी कार्यालय अथवा पोलिस विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी घेतलेली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. मनोज राजेंद्र देहाडे याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, ड्रोन अधिनियम २०२१ चा नियम २२ तसेच वायुमान अधिनियम १९३४ च्या कलम १० अन्वये पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड तसेच अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, उपनिरीक्षक खंडागळे, सहाय्यक फौजदार विक्रम देशमुख, जमादार अविनाश बोर्डे, संजय घुगे, श्रीमंत भालेराव, राजेंद्र डकले व गणेश घोरपडे यांनी केली असून पुढील तपास पैठण पोलिस ठाणे करीत आहे.
महत्त्वाची धरणे, शासकीय इमारती व संवेदनशील ठिकाणे ही ‘नो ड्रोन झोन’ अंतर्गत येतात. अशा ठिकाणी विनापरवाना ड्रोन उडवणे हा गंभीर गुन्हा असून नागरिकांनी तसेच हौशी छायाचित्रकारांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.






