
रुग्णवाहिका हॉस्पिटलमध्ये पोहोचली, पण पुढच्याच क्षणी घडलं धक्कादायक; नागरिकांनी चालकाला धरलं धारेवर
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेतील निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वायसीएम रुग्णालयाच्या परिसरात धावत्या रुग्णवाहिकेतून एक रुग्ण खाली पडल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत रुग्णाला गंभीर दुखापत झाली नसल्याचे प्राथमिक चित्र आहे. मात्र, या घटनेमुळे रुग्णवाहिकेतील रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेचे काही सजग नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. रुग्ण खाली पडल्यानंतर रुग्णवाहिका चालक आणि एक पोलिस कॉन्स्टेबल पुन्हा घटनास्थळी आल्याचेही दिसून येत आहे. उपस्थित नागरिकांनी रुग्णवाहिका चालकाला जाब विचारला.
रुग्णवाहिकेतून रुग्णालयाच्या परिसरात रुग्ण खाली पडल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक माहितीनुसार, रुग्णाला या घटनेत गंभीर दुखापत झाली नसल्याचे दिसून येते. त्यानंतर रुग्णाला पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णवाहिकेतून प्रवास करताना रुग्णाची सुरक्षितता ही संबंधित कर्मचारी आणि चालकाची जबाबदारी असते. त्यामुळे रुग्ण नेमका कसा खाली पडला, रुग्णवाहिकेचा दरवाजा व्यवस्थित बंद होता का आणि संबंधित कर्मचाऱ्यांकडून कोणताही निष्काळजीपणा झाला का, याची चौकशी होणे आवश्यक आहे.
घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी रुग्णवाहिका चालक तसेच वायसीएम रुग्णालय प्रशासनावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, या घटनेमुळे वायसीएम रुग्णालयाच्या प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन या घटनेची गंभीर दखल घेऊन चौकशी करणार का आणि निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.