
सायबर चोरट्यांना बँक खाते वापरण्यास देणाऱ्याला ठोकल्या बेड्या; 'या' परिसरात सापळा रचून पकडले
शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा प्रकारचे किमान दोन ते तीन गुन्हे दररोज शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल होतात. सायबर चोरटे फसवणुकीची रक्कम थेट स्वत:च्या खात्यात जमा करत नाही. त्यासाठी चोरटे पैशांचे आमिष दाखवून नागरिकांच्या बँक खात्याचा वापर करतात. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची ७३ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
निगडीतील हनुमान मंदिर परिसरात लावला सापळा
सायबर पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक तपासात चोरट्यांनी फसवणूक केलेल्या रक्कमेपैकी ३० लाख ८४ हजार रुपये निगडीतील एका बँकेच्या खात्यात जमा करुन घेतले होते. टप्याटप्याने दहा व्यवहारांद्वारे ही रक्कम चोरट्यांनी निगडीतील बँकेतील खात्यात जमा केली होती. पोलिसांनी संबंधित खातेधारकाची माहिती घेतली. तेव्हा हे खाते सूरज ट्रेडलाईन नावाचे असून, हे खाते लोढा याचे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. निगडीतील हनुमान मंदिर परिसरात सापळा लावून पोलिसांनी लोढा याला ताब्यात घेतले. लोंढा याच्याकडून दोन मोबाइल संच आणि तीन डेबिट कार्ड जप्त करण्यात आली.
नागरिकांना आवाहन
गेल्या काही दिवसांपासून तपास यंत्रणांकडून कारवाईची भीती दाखविणे, शेअर बाजारात गुंतवणूक, तसेच घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. नागरिकांनी सायबर चोरट्यांच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.