तोतया आयकर अधिकारी घरात शिरले, कागदपत्रे तपासण्याचे ढोंग केले अन्...
सांगली : कवठेमहांकाळ येथील डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरी बनावट आयकर अधिकारी बनून छापा टाकणाऱ्या चोरट्यांच्या टोळीतील तिघांना अवघ्या ६० तासात पोलिसांनी जेरबंद केले आहे. चोरट्यांकडून १ कोटी २० हजार रुपये रकमेचे सोने आणि रोख १५ लाख असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण, कवठेमहांकाळ पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई केली आहे. या संदर्भात पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.
टोळीतील सात जणांपैकी दीक्षा राष्ट्रपाल भोसले (वय २५, रा. काकडे पार्क, बिल्डिंग, चिंचवड, पुणे), पार्थ महेश मोहिते (२५, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर), साई दीपक मोहिते (वय २३, रा. प्रगतीनगर, पाचगाव, करवीर, कोल्हापूर) यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या तर टोळीचा म्होरक्या महेश रघुनाथ शिंदे (जयसिंगपूर, सध्या रा. घाटकोपर, मुंबई), अक्षय लोहार (रा. संकेश्वर, जि. बेळगाव), शकील पटेल (गडहिंग्लज, कोल्हापूर), आदित्य मोरे (रुकडी, ता. हातकणंगले, कोल्हापूर) हे अद्यापही पसार आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना पोलिस अधीक्षक घुगे म्हणाले, कवठेमहांकाळ शहरातील झुरेवाडी रस्त्यावरील डॉ. जे. डी. म्हेत्रे यांचा दवाखाना व निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थानी रविवारी रात्री अकराच्या सुमारास आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून चार चोरट्यांनी प्रवेश केला. बेमालुमपणे अभिनय करीत काही कागदपत्रे तपासण्याचे ढोंग तोतया अधिकाऱ्यांनी केलेे. त्यामुळे घाबरलेल्या डॉ. म्हेत्रे यांनी व्यवसायातील सर्व हिशेब त्यांना दिला. घरातील एक किलो सोने, १५ लाख ६० हजारांची रक्कमही त्यांच्या समोर ठेवली. हा सर्व मुद्देमाल घेऊन काही वेळानंतर चोरटे तेथून निघून आले. त्यानंतर डॉक्टरांनी माहिती घेतली असता त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
यााबाबत दुसऱ्या दिवशी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. एलसीबी व कवठेमहांकाळ पोलिसांच्या पथकांनी घटनेचा कसून तपास सुरू केला. त्यावेळी खबऱ्या व तांत्रिक माहितीच्या आधारे बनावट आयकर अधिकारी दीक्षा भोसले ही पुण्यात असल्याची माहिती पथकास मिळाली. त्यानुसार महिला अधिकाऱ्यासह एक पथक पुण्यात दाखल झाले. त्यांनी छापेमारी करत दीक्षा भोसले हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिली. हा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिस अधिक्षक संदिप घुगे यांच्यासह अपर पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरिक्षक सतीश शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार, नितीन सावंत, दत्तात्रय कोळेकर, रुपाली बोबडे, पोलीस उपनिरिक्षक तेजश्री पवार, विनायक मासाळ या अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचाऱ्यांचा महत्वाचा सहभाग आहे.
प्रमुख सूत्रधार जयसिंगपूरचा
पोलिस चौकशीत टोळीतील अन्य साथीदारांची नावे निष्पन्न झाली. त्यापैकी संशयित पार्थ आणि साई या दोघांना कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथून अटक केली. त्यांच्याकडे १ हजार ४१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, बिस्किटे व पंधरा लाख ५ हजारांचा रोकड मिळून आली. तिघांकडे कसून चौकशी केली असता अन्य संशयितांची नावे निष्पन्न झाली. त्यापैकी महेश शिंदे हा मूळचा जयसिंगपूर येथील असून सध्या तो मुंबईत वास्तव्यास आहे. तो या गुन्ह्याचा प्रमुख सूत्रधार आहे.
पुणे, मुंबई, कोल्हापूर, बेळगावमधील चाेरटे
बनावट आयकर अधिकारी असल्याचे भासवून लुटमार करणाऱ्या टोळीतील चोरटे पुणे, मुंबई, हातकणंगले आणि कोल्हापूर जिल्ह्यतील तसेच बेळगाव येथील असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. कवठेमहांकाळ येथे डॉक्टरांच्या घरावर छापा मारल्यावर अवघ्या काही तासात विविध दिशांना रवाना झाले होते. त्यामुळे त्यांना पकडणे पोलिसांसमोर आव्हान होते. या सर्व चोरट्यांची ओळख कशी झाली ? त्यांनी यापूर्वी कोणत्या शहरात बनावट अधिकारी असल्याचा बनाव करुन छापेमारी केली आहे का ? याचा तपास पोलीस करीत आहेत.
अभिनय करणारी चौकडी
डॉक्टरांच्या घरी आयकर अधिकारी असल्याचा बहाणा करुन छापेमारी करायची तयारी चोरट्यांनी पध्दतशीरपणे केली होती. सूत्रधार महेश शिंदे हा अभियंता आहे. त्याने हा प्लॅन केला. त्यानुसार तो स्वत: बनावट अधिकारी बनला होता. त्याच्यासोबत दीक्षा भोसले, अक्षय लोहार आणि शकील पटेल या साथीदारांनी आयकर अधिकाऱ्याची भूमिका बजावली.