
कोथरुडमधील फसवणूकप्रकरणी मोठी अपडेट; भोंदूबाबासह तिघांना ठोकल्या बेड्या
पुणे : दुर्धर विकाराने ग्रासलेल्या मुलींचे आजारपण दूर करण्याच्या आमिषाने कोथरूडमधील दाम्पत्याची १४ कोटींची फसवणूक केल्याचा प्रकर उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने भोंदू बाबासह तिघांना नाशिक शहरातून अटक केली आहे. आरोपींना १४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
याप्रकरणी वेदिका कुणाल पंढरपूरकर, कुणाल वैजनाथ पंढरपूरकर (दोघे रा. २२, कैलासदीप, गल्ली क्रमांक ११, महात्मा सोसायटी, कोथरूड), दीपक जनार्दन खडके (जय शंकर फार्म हाऊस, नाशिक) यांना अटक केली आहे. याप्रकरणी वेदिकाची आई आणि भावावर गुन्हा दाखल आहे. याबाबत दीपक पुंडलिकराव डोळस यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दीपक डोळस हे मूळचे पुण्यातील आहेत. ते इंग्लडमधील आयटी कंपनीत नोकरीस होते. त्यांची एक मुलगी मतिमंद आहे. दुसरी मुलगी दुर्धर विकाराने ग्रस्त आहे. मुलींवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी ते २०१० मध्ये भारतात परतले. डोळस दाम्पत्य कोथरूडमधील भजनी मंडळात जायचे. तेथे एकामार्फत दीपक खडसे याच्याशी ओळख झाली. खडसेने डोळस यांची आरोपी वेदिका पंढरपूरकर हिच्याशी ओळख करुन दिली. ‘वेदिका ही एका बाबांची लेक आहे. तिच्या अंगात दैवी संचार होतो,’ असे खडके याने तक्रारदारांना सांगितले. मोठी रक्कम दिल्यानंतरही मुलींच्या आरोग्यात सुधारणा झाली नाही. याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे अर्ज दिला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाबर व त्यांच्या पथकाने तिघांना नाशिक परिसरातून अटक केली आहे. पोलिस निरीक्षक अनिल माने तपास करत आहेत .
आरोपीनी माणुसकीला काळिमा फसणारे कृत्य केले आहे. मतिमंद मुलीची एलआयसी पॉलिसी खंडित करून त्या पैश्याचा देखील स्वतः च्या फायद्यासाठी वापर केला आहे. त्यांना कोणतीही दया दाखवता येणार नसल्याचा युक्तिवाद आम्ही केला आहे. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. – अॅड. विजयसिंह ठोंबरे