पुणे : वर्षभरापूर्वी पुण्यात झालेल्या वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीने आयुष कोमकरला संपवले. 5 सप्टेंबरला गणेश विसर्जनाच्या आदल्या रात्री आठ वाजता पुण्यातील नाना पेठ परिसरात दोन मारेकऱ्यांनी आयुष कोमकर याच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी काही दिवसाखाली आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. अशातच आता आणखी आंदेकर टोळीच्या अडचणी वाढल्या आहेत.
आंदेकर टोळीचा राहता परिसर असलेल्या नाना पेठेतील डोक तालमीजवळ बेकायदा फलक (फ्लेक्स) लावल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह त्याच्या कुटुंबीयांवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी पुणे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी समर्थ पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. त्यानूसार, आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, कृष्णा बंडू आंदेकर, माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर, शिवम उदयकांत आंदेकर, अभिषेक उदयकांत आंदेकर, शिवराज उदयकांत आंदेकर, सोनाली वनराज आंदेकर, प्रियंका कृष्णा आंदेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नाना पेठेतील इनामदार कॉम्प्लेक्स इमारतीच्या परिसर आहे. या परिसरात आंदेकर टोळीने बेकायदा फलक लावले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग, तसेच शहराचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी आंदेकर टोळीविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यात बंडू आंदेकरसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. एका मंडळाच्या पदाधिकाऱ्याने बेकायदा फ्लेक्स लावल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार सचिन गायकवाड करत आहेत.
आंदेकर टोळीने केलेल्या बेकायदा बांधकामांवर पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने नुकतीच कारवाई केली. या कारवाईत पत्र्याचे शेड, तात्पुरते केलेले बांधकाम, तसेच गणेश पेठेतील नागझरीत बेकायदा सुरू केलेल्या मासळी बाजारात ही कारवाई करण्यात आली होती. आता बेकायदा फ्लेक्स लावल्याप्रकरणी गुन्हे नोंदविले गेले आहेत.
हे सुद्धा वाचा : स्कुटीला धक्का लागल्यावरुन वाद; घरात घुसून केला तरुणाचा खून