संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. दररोज खून, हाणामाऱ्या, लुटमार, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रांजणगाव एमआयडीसी परिसरात किरकोळ वादातून घरात घुसून हल्ला करत तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील पसार झालेल्या दोघांना केवळ दोन तासात अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
ओंकार सिताराम वाळके आणि विजय ज्ञानेश्वर जगधने (दोघेही रा. कोरेगाव, ता. शिरूर) अशी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या देखरेखीखाली करण्यात आली आहे.
दिनांक ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कारेगाव येथील यशईन चौकात मोहम्मद शकील मोहम्मद हाजी आणि त्याचा भाऊ सिद्दिकी मोहम्मद मुजम्मील मोहम्मद हाजी हे दोघे पायी जात होते. तेव्हा त्यांच्या मागून आलेल्या स्कुटीला त्यांचा धक्का लागला. स्कुटीवरील ओंकार वाळके व त्याच्या साथीदारांनी या घटनेबद्दल जाब विचारला. यावरून त्यांच्यात किरकोळ वाद झाला. हा राग मनात धरून दोघांनी दुसऱ्या दिवशी (दि. ४ ऑक्टोबर) पहाटे त्यांच्या राहत्या घरी जाऊन हल्ला केला. ओंकार वाळके आणि त्याचा साथीदार यांनी लाकडी दांडे, प्लास्टिक पाईप आणि हाताने दोघांना मारहाण केली. यात सिद्दिकी मोहम्मदचा मृत्यू झाला, तर मोहम्मद शकील गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर दोघे फरार झाले होते. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट देत तातडीने आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या. तपास पथकातील सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार ब्रह्मा पोवार, अभिमान कोळेकर, विजय सरजिणे, योगेश गुंड व गणेश वाघ यांनी गोपनीय माहितीच्या आधारे ओंकार वाळके आणि विजय जगधने यांना अटक केली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक शिवाजी मुंढे करीत आहेत.