उत्तम जाधव खूनप्रकरणी मोठी अपडेट; आरोपी टोळीप्रमुखासह 12 जणांवर थेट...
इंदापूर : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज खून, मारामाऱ्या, दरोडे, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत आहेत. अशातच आता इंदापूर तालुक्यातून एक बातमी समोर आली आहे. इंदापूर तालुक्यात श्रेयविषयक वादातून झालेल्या उत्तम जाधव यांच्या निर्घृण खून प्रकरणात आरोपी टोळीप्रमुखासह १२ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. इंदापूर तालुक्यात अशा प्रकारची ही पहिलीच मोठी कारवाई असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जंक्शन (ता. इंदापूर) येथील वालचंदनगर पोलीस स्टेशनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेस अप्पर पोलीस अधीक्षक बिरादार, तपासी अधिकारी डीवायएसपी डॉ. सुदर्शन राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी तयार केलेला मोक्का कारवाईचा प्रस्ताव पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या मार्फत कोल्हापूर परिक्षेत्राकडे पाठविण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाल्याने कारवाईची अंमलबजावणी झाली आहे.
आर्थिक फायद्यासाठी कृत्य
काही महिन्यांपूर्वी निमसाखरजवळील वीर वस्ती ओढ्या परिसरात श्रेयविषयक वादातून उत्तम जाधव यांच्या गाडीला अडवून कोयता, तलवार, दगड व काठ्यांनी हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर वालचंदनगर पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले. तपासादरम्यान समोर आले की, आरोपी इंदापूर, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, नातेपुते परिसरात वर्चस्व वाढवून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी सातत्याने बेकायदेशीर कृत्य करत होते. या संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.
मोक्का अंतर्गत आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत
राजेंद्र ऊर्फ राजू महादेव भाळे, रामदास ऊर्फ रामा शिवाजी भाळे, शुभम ऊर्फ दादा बापू आटोळे, स्वप्नील बबन वाघमोडे, नाना भागवत भाळे, निरंजन लहु पवार, तुकाराम ज्ञानदेव खरात, मयूर ऊर्फ जिजा मोहन पाटोळे, अशोक बाळु यादव, धनाजी गोविंद मसुगडे, सोमनाथ बबन पवार, सनि विलास हरिहर, अक्षय भरत शिंगाडे.
पुण्यात हॉकी स्टीकने मारहाण करुन तरुणाचा खून
चंदननगर भागात चुलतीला आय लव यू म्हणाल्याचा रागातून तरुणाचा दोघांनी हॉकी स्टिक आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे. चंदननगर येथील भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव (वय ३५, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर (वय २१), समर्थ उर्फ करण पप्पू शर्मा (वय २१, दोघे रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) यांना अटक करण्यात आली. याबाबत पोलीस हवालदार राहुल गिरमे यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.