कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात शहरातील एमआयडीसी भागातील जी-सेक्टरमध्ये सागर हॉटेल व लॉजिंग येथे कुंटणखाना सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. त्यानंतर संबंधितांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : हिंगोलीतील तलाठी संतोष पवार यांच्या हत्येच्या निषेधार्थ सिंधुदुर्गात आज काम बंद आंदोलन
एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये असलेले सागर हॉटेल व लॉज येथे बेकायदेशीर कुंटणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार, मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली.
तसेच याठिकाणी वेश्या व्यवसाय चालवण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. एमआयडीसी महिला पोलीस कॉन्स्टेबल सपना एअरगुंडला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हॉटेलचे मालक सागर सोनवणे आणि चालक सागर पाटील या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
नागपुरातूनही समोर आला होता प्रकार
यापूर्वी नागपुरात एका फ्लॅटमधून देह व्यवसायाचा भांडाफोड करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने गोपनीय माहितीवरून धाड टाकत सदर पोलिस ठाण्यांतर्गत ही कारवाई केली होती. यामध्ये एका महिलेसह दोन आरोपींना अटक करून दोन पीडित महिलांची त्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आली. या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता हा प्रकार समोर आला आहे.
गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ
राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता जळगावात हॉटेलमध्येच कुंटणखाना सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
हेदेखील वाचा : कल्याण बाजारपेठेत पोलिसांची मोठी कारवाई; गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरणारे चोरटे गजाआड