प्रफुल्ल लोढाच्या अडचणी आणखी वाढल्या, महिलेचे गंभीर आरोप; बावधन पोलिसांनी घेतले ताब्यात
पिंपरी : हनी ट्रॅप आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी प्रफुल्ल लोढाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. प्रफुल लोढाच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल झालेली आहे. पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात एका ३६ वर्षीय पीडित महिलेने लोढा विरोधात तक्रार दिली आहे. या गुन्ह्यातील तपासाठी पिंपरी- चिंचवडच्या बावधन पोलिसांनी लोढाला ताब्यात घेतलं आहे. प्रफुल्ल लोढाला बावधन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात यावं म्हणून कोर्टाला हस्तांतरित वॉरंट मागण्यात आलं होतं. आज सकाळी ऑर्थर रोड कारागृहातुन ताब्यात घेतलं आहे.
नेमकं काय घडलं होतं?
२७ मे २०२५ रोजी पुण्यातील बालेवाडी येथील नामांकित हॉटेलमध्ये महिलेला बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. प्रफुल्ल लोढाने पीडित महिलेच्या पतीला नोकरी लावतो असे आमिष दाखवून हॉटेलवर बोलवून घेऊन अत्याचार केला आहे. याआधी मुंबईमधील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलीस ठाण्यात हनी ट्रॅप आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. प्रफुल्ल लोढाच्या चौकशीत नेमकं पुढे काय येत पाहावं लागेल. तसेच लोढाला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
प्रफुल्ल लोढा कोण आहे?
प्रफुल लोढा मूळचा जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर पेठ गावाचा रहिवासी आहे. गावात वडिलोपर्जित शेती, प्लॉट, सिनेमा थिएटर, त्याच बरोबर विविध ठेकेदारी व्यवसाय राहिला आहे. मंत्री गिरीश महाजन सरपंच झाल्यानंतर त्यांच्या सोबत त्याने भाजप कार्यकर्ता ते आरोग्यसेवक म्हणून जवळपास वीस वर्ष काम केलं आहे. 1995 साली पंचायत समितीसाठी निवडणूक लढवली, पण पराभव पत्करावा लागला होता. गिरीश महाजन मंत्री झाल्यानंतर काही कालावधीत त्यांच्याकडे तो मोठ्या कामांची मागणी करू लागल्याने त्यांच्यामध्ये वितुष्ट आले. यानंतर गिरीश महाजन यांना शह देण्यासाठी त्याने राष्ट्रवादीमधे प्रवेश केला होता. याच काळात त्याने आपल्याकडे एक बटण दाबले तर सगळं काही उघड होईल, असा गिरीश महाजन यांचे नाव न घेता दावा केला होता. 2024 मधील लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे इच्छुक उमेदवार असल्याचा दावा करत उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, पाच दिवसात माघार घेतली होती. त्यानंतर पुन्हा भाजपशी जुळणी केल्याचे सांगितले जात आहे. भाजपमध्ये किंवा इतर पक्षात असतानाही त्याच्याकडे कोणतेही पद मात्र देण्यात आले नव्हते. एकनाथ खडसे यांच्या विरोधातही त्याने मद्यपान करून पत्रकार परिषद घेतली होती. त्यांच्या मुलाच्या आत्महतेबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते.