प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी; कोर्टात युक्तिवादादरम्यान कोरटकरला अक्षरश: घामच फुटला
कोल्हापूर : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याला अटक करण्यात आली. जिल्हा न्यायालयात कोरटकरला हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यावेळी कोरटकरचे वकील आणि सरकारी वकील यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला. हा युक्तिवाद पाहता कोरटकरला यावेळी चांगलाच घाम फुटला.
प्रशांत कोरटकरला जुना राजवाडा पोलिसाच्या पथकाने सोमवारी दुपारी चारच्या सुमारास तेलंगणा येथून अटक केली होती. रात्रभर सुमारे 12 तासांचा प्रवास केल्यानंतर मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास पोलिसांचे पथक कोल्हापुरात पोचले. त्यानंतर त्याला राजवाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. राजवाडा पोलीस ठाण्यातून प्रचंड पोलीस बंदोबस्तात कसबा बावडा येथील जिल्हा न्यायालयात सकाळी 11 वाजता हजर करण्यात आले. यावेळी न्याय संकुलच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी अक्षरश: त्याला प्रसारमाध्यमाना तसेच शिवप्रेमींना चकवा देत न्यायालय आवारातून पळवत न्याय कक्षात आणले.
न्यायालयासमोर इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी बाजू मांडताना सांगितले की, कोरटकर यांनी पोलीस तपासात मदत केली नाही. सावंत यांना फोनवरून धमकी दिलेला आवाज माझा नाही, असा दावा न्यायालयात केला आहे. त्यामुळे त्याच्या आवाजाचे नमुने तपासणे महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर चंद्रपूर पोलीस मुख्यालयासमोर तो राहिला होता. पोलिसांच्या जवळच असताना तो फरार झाला कसा? याची चौकशी होणे आवश्यक आहे. त्याला कोणी मदत केली याची चौकशी करणे आवश्यक आहे.
मोबाईल डेटा केला डिलिट
विशेषतः तो कुठे-कुठे फिरला. कोणाच्या सानिध्यात आला. मोबाईल डाटा डिलीट केला आहे. या तपासाकरता सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी केली. या मागणीनंतर न्यायालयाने त्याला तीन दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. तीन दिवसांची पोलीस कोठडी दिल्यानंतर पोलिसांनी त्याला धरून बाहेर आणले.
कोल्हापुरी हिसका दाखवण्याचा प्रयत्न
यावेळी न्यायालयीन आवारात शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शिवप्रेमींनी हातात चप्पल घेऊन कोल्हापुरी हिसका दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत शिवप्रेमींना ताब्यात घेऊन पोलीस गाडीत बसवले. यावेळी न्यायालय आवारात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.