सोजन्य फोटो - सोशल मडीया
घराची आणि शेतीची चिंता
प्रथमेशच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबावर काही लाख रुपयांचे कर्ज होते. त्यातच शेतीचे नुकसान झाल्याने आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. मागील वर्षी तुरीचे पीक वाहून गेले होते. यंदा पाण्याअभावी पीक वाळून गेल्याचे प्रथमेशने आईला सांगितले होते. शेतीचे नुकसान आणि घरखर्चाची चिंता प्रथमेशला सतावत असल्याचे आईने सांगितले. “निसर्गाच्या पुढे कुणाचे चालत नाही. तू काळजी करू नकोस. तुझे दाजी तुला पैसे पाठवत आहेत. तू घरची चिंता करू नकोस, अभ्यास कर,” असे आपण त्याला समजावून सांगितल्याचे आईने भावुक होत सांगितले.
परीक्षेच्या तणावाचाही उल्लेख
प्रथमेश स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असताना परीक्षांचे वेळापत्रक पुढे ढकलले जाणे आणि त्यातून निर्माण होणारी अनिश्चितता यामुळेही तो चिंतेत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. आर्थिक परिस्थिती आणि परीक्षेच्या तणावामुळे तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. प्रथमेशची बहीण सांगते की, तो सुमारे आठ दिवसांपूर्वी गावाकडे आला होता. त्यावेळी दोघांमध्ये गप्पाही झाल्या. अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून पुण्यात असताना त्याला वारंवार फोन केला जात नव्हता. साधारणपणे १५ दिवसांतून एकदा त्याच्याशी बोलणे होत असल्याचे तिने सांगितले.
कुटुंबीयांकडून विविध कारणांचा उल्लेख
गावाहून पुण्याला जाताना प्रथमेश नाराज असल्याचे बहिणीने सांगितले. पुण्यात पोहोचल्यानंतरही फोनवर बोलताना त्याच्या आवाजातून नाराजी जाणवत होती, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. प्रथमेशच्या मृत्यूमागे आर्थिक विवंचना, शेतीचे नुकसान, स्पर्धा परीक्षेचा ताण आणि आरक्षणाचा प्रश्न कारणीभूत असल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. मात्र मृत्यूमागील नेमकी कारणे अधिकृत तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे. या घटनेमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांसमोरील ताणाचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे.






