सौजन्य फोटो - सोशल मिडीया
“मुलगी देता का मुलगी?” असा सवाल
किसनदेव ननावरे यांच्याकडे सुमारे अर्धा एकर शेती आहे. सध्या ते बेरोजगार असून, या परिस्थितीमुळे आपले लग्न जमत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकरी आणि बेरोजगार तरुणांच्या विवाहाचा प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. डोईवर बाशिंग बांधून केलेल्या या आंदोलनाने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले. लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याची समस्या केवळ वैयक्तिक नसून अल्पभूधारक शेतकरी आणि बेरोजगार तरुणांसमोरही हा प्रश्न असल्याचा दावा ननावरे यांनी केला आहे.
विवाह नोंदणी केंद्राची मागणी
समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून शेतकरी आणि बेरोजगार तरुणांसाठी सरकारी सर्वधर्मीय विवाह नोंदणी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. अशा माध्यमातून विवाहासाठी इच्छुक तरुण-तरुणींना योग्य व्यासपीठ उपलब्ध होईल, अशी त्यांची भूमिका आहे.
१ लाखांच्या लग्न अनुदानाची मागणी
विवाहबद्ध होणाऱ्या शेतकरी आणि बेरोजगार तरुणांना शासनाने १ लाख रुपयांचे लग्न अनुदान द्यावे, अशी मागणीही ननावरे यांनी केली आहे. आर्थिक परिस्थितीमुळे विवाहाचा प्रश्न निर्माण होणाऱ्या तरुणांना शासनाने मदत करावी, अशी त्यांची मागणी आहे. तसेच विवाहानंतर निवाऱ्यासाठी २ लाख रुपयांचे घरकुल मंजूर करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर स्वावलंबी होण्यासाठी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी २ लाख रुपयांचे बिनव्याजी आणि विनाजामीनदार कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनाची सोलापूरमध्ये चर्चा
शेतकरी आणि बेरोजगार तरुणांच्या विवाहाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचा दावा करत ननावरे यांनी हे आंदोलन केले. त्यांच्या अनोख्या आंदोलनाची सोलापूर जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत धरणे आंदोलनातून उठणार नसल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. आता प्रशासन या मागण्यांकडे कशा पद्धतीने पाहते आणि त्यावर काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे.






