कारागृहातच कैद्याची आत्महत्या; लोखंडी गजाला जोरदार धडक दिली अन् जखमी होताच...
छत्रपती संभाजीनगर : कारागृहात शिक्षा भोगत असताना कैद्याने आत्महत्या केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यातच आता परंडा येथे एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा लागलेल्या एका कैद्याची रवानगी हसूल कारागृहात करण्यात आली होती. कारागृहातील दीड महिन्याच्या कालावधीत कैद्याने लोखंडी गजाला जोरदार धडक घेऊन स्वतःला जखमी करून घेतले होती. या कैद्यांवर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
विजय उर्फ बोधीराम विक्रम गोरे (वय ३१, रा. अंतरगाव, ता. भूम) असे मृत कैद्याचे नाव आहे. या प्रकरणात मध्यवर्ती कारागृह हसूल येथील सुभेदार संजय रूपचंद अहिरराव (वय ५६) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हसूल कारागृहात भुम परांडा येथील अंतरगावात झालेल्या एका खून प्रकरणात विजय उर्फ बोधीराम विक्रम गोरे याला १७ ऑगस्ट रोजी हसूल जेलमध्ये आणण्यात आले. हसूल जेलमध्ये विजय उर्फ बोधीराम याला जुने सर्कल १६ विभाग बराक क्रमांक १४ मध्ये ठेवण्यात आले होते.
हेदेखील वाचा : Crime News : सामूहिक आत्महत्या की हत्या? 18 व्या मजल्यावरून मारली उडी अन्… तरुणांच्या मृत्यूने विरारमध्ये खळबळ
रविवारी (दि.५) सकाळी कारागृह उघडले गेले. सकाळी सातच्या सुमारास विजय गोरे हा बराक क्रमांक १३ व १४ समोरील परिसरात फिरत असताना त्याने बराक क्रमांक १३ समोरून जोरात धावून बराक क्रमांक १५ च्या लोखंडी गजावर स्वतःचे डोके जोरात आपटून स्वतःला दुखापत करून घेतली. या या धडकेमुळे विजय गोरे याच्या डोक्यातून व तोंडातून रक्तस्त्राव होत होता.
ठाण्यात गुन्हा दाखल
हसूल कारागृहाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जखमी विजय गोरे याला तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचार सुरु असता, ६ ऑक्टोबर रोजी विजय उर्फ बोधीराम विक्रम गोरे याचा मृत्यू झाला. या प्रकरणी संजय अहिरराव यांच्या तक्रारीवरून मृत विजय उर्फ बौधीराम विक्रम गोरे याच्या विरोधात हसूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक केदार यांच्याकडे देण्यात आला आहे.
दीड महिना राहिला होता शांत
विजय उर्फ बोधीराम गोरे याला हसूल जेलमध्ये १८ ऑगस्ट रोजी आणण्यात आले. हसूल जेलमध्ये आल्यापासूनच गोरे हा शांत राहिला. तो कोणाशीही बोलत नव्हता. त्याची मानसिक स्थिती बरोबर नव्हती. यामुळे त्याला सर्कल १६ विभागाच्या १४ मध्ये तात्पुरते बंदीसाठी ठेवण्यात आले होते, अशीही माहिती कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी दिली.