बाहेर फिरायला जायचा प्लान करताय? सावधान! पर्यटनाच्या नावाखाली पुण्यातील अनेकांची फसवणूक
पुणे : टुरिझम कंपनीच्या नावाखाली केरळ येथील ट्रीपचे आयोजन केल्यानंतर नागरिकांकडून बुकिंगचे पैसे स्वीकारले. मात्र, या नागरिकांना ट्रीपला न नेता दोन सख्या भावानी अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांकडे आतापर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार एकूण आठ लाख ७२ हजार ९२३ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी वडगाव खुर्द येथे राहणाऱ्या ५२ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.
त्यानुसार, प्रणित सोरटे (वय ३२) आणि प्रतीक सोरटे (वय ३३) या दोघांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनी कात्रज येथे ‘फिनिक्स टुरिझम’ नावाचे कार्यालय सुरू केले होते. त्या माध्यमातून नोव्हेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान ही फसवणूक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रणित आणि प्रतीक सोरटे या दोघांनी तक्रारदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना केरळ टूरचे आमिष दाखवून सुरुवातीला एक लाख ९५ हजार ३५० रुपये घेतले. मात्र, टूर रद्द करून पैसेही परत केले नाहीत. तसेच, तक्रारदाराचे एक मित्र व त्यांचे सहकारी यांच्याकडून अनुक्रमे चार लाख ५७ हजार ५७३ रुपये, दीड लाख रुपये आणि एकाकडून ७० हजार रुपये घेऊन अनेक जणांची फसवणूक केली. आरोपींनी एकूण आठ लाख ७२ हजार ९२३ रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.