
crime (फोटो सौजन्य: social media)
पुण्यातील दौंड शहरातील अहिल्यानगर मार्गावरील लोखंडे वस्ती परिसरात मध्यरात्री दुहेरी दरोड्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. या दरोड्याचा थरार
सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. दरोडेखोरांनी सुमारे एक लाख रुपये रोख रक्कम पाच तोळे सोन्या चांदीच्या दागिन्यांसह इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्याचा समोर आलं आहे. पहिला दरोडा हा हिरालाल शाहूराव शिंदे यांच्या बंद बंगल्यावर टाकण्यात आला. तर दुसरा दरोडा हा काही अंतरावर असलेल्या दत्तात्रय सपकाळ यांच्या शेतातील बंगल्यावर टाकण्यात आला.
पहिल्या दरोडा पाच जणांच्या टोळीने टाकला. मध्यरात्री दरवाजे तोडून घरात प्रवेश केला. चोरीस गेलेल्या मुद्देमालाचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नसून घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तर दुसऱ्या दरोड्यात सुमारे एक लाख रुपये रोख रक्कम पाच तोळे सोन्याचे दागिने यासह चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूं लंपास केल्याची माहिती मिळाली आहे. दौंड पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.
सीसीटीव्हीत काय?
दुसरा दरोडा हा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दौंड- अहिल्यानगर- मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील सोनवडी गावातील लोखंडे वस्तीवर पहाटेच्या सुमारास हा दरोडा पडला.दत्तात्रय सपकाळ यांच्या बंगल्यावर या अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला.दरोडेखोरांनी ओढ्याजवळ असलेल्या बंगल्याच्या बाजूचे लाकडी दार उचलले.घरात प्रवेश केला आणि खोलीमधील लाकडी कपाटाचे ड्रॉवर व लॉकरचे कुलूप तोडण्यात आले. कपाटातील किमान पाच तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व एक लाख रूपयांची रोकड या दरोडेखोरांनी लंपास केली.याशिवाय सपकाळ यांची कांद्याची व कपाशीची पट्टी असलेली रोकडच चोरीला गेली आहे. बंगल्याच्या मागील बाजूच्या संरक्षक जाळ्याच्या लोखंडी तारा तोडून दरोडेखोरांनी गोदामात देखील उचकापाचक केल्याची माहिती समोर येत आहे.
पोलीस तपास सुरु
दौंड सारख्या गजबजलेल्या शहरात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे. या दरोडेखोरांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.