संग्रहित फोटो
Today Live news on Pune Crime News : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाही. असे असताना आता वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे एका रिक्षाचालकाने मित्राच्या सहाय्याने दोन सख्ख्या बहिणींवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दोघींनी प्रसंगावधान साधून धावत्या ऑटोतून उड्या मारल्या. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
04 Mar 2025 06:38 PM (IST)
स्वारगेट बसस्थानकातील अत्याचारप्रकरणातला नराधम दत्तात्रय गाडेने महिला छेडछाड तसेच अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याची दाट शक्यता पोलिसांना आहे. त्याच्या छेडछाडीला कोणी बळी पडले असल्यास त्याबाबत गुन्हे शाखेकडे तक्रार करावी, असे आवाहन पुणे पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेकडे सोपविला आहे.
04 Mar 2025 04:05 PM (IST)
संतोष देशमुखांना मारहाण करतेवेळी आरोपींनी जो पाईप वापरला होता, त्याचे १५ तुकडे सीआयडीने जमा केले होते. याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. तसेच याचा फोटोही आरोपपत्रात जोडण्यात आला आहे. संतोष देशमुख यांना वेगवेगळ्या शस्त्रांनी मारहाण करण्यात आली होती. त्याचे काही फोटो समोर येत आहेत. सीआयडीने जे आरोपपत्र सादर केलेले आहे त्यात एका पाईपच्या १५ तुकड्यांचा फोटोही जोडलेला आहे. याच पाईपने संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी हा आणखी एक मोठा पुरावा असल्याचे म्हटलं जात आहे.
04 Mar 2025 02:25 PM (IST)
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात रोज नवीन माहिती उघड होत आहे. या प्रकरणात मंगळवारी मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. आरोपींनी किती क्रूर आणि अमानुषपणे संतोष देशमुख यांची हत्या केली, ते उघड होत आहे. संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपींनी ग्रुपवर व्हिडिओ कॉल केला होते, हे सीआयडीच्या चार्जशीटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांची होत असलेली हत्या अनेक लोकांनी त्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाहिली असण्याची शक्यता आहे.
04 Mar 2025 12:52 PM (IST)
बीडमधील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. तीन महिने उलटूनही एक आरोपी अजूनही फरार आहे. या क्रूर हत्येमुळे बीडमध्ये मंगळवार 4 मार्च रोजी बंद पुकारण्यात आला आहे. आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी होत आहे. सोशल मीडियावर ही घटना चर्चेचा विषय बनली आहे.
04 Mar 2025 11:50 AM (IST)
स्वारगेट अत्याचार प्रकरणात पुणे पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पुढील १५ दिवसांत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याचे नियोजन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पोलिसांकडून आरोपीविरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम वेगाने सुरू असून, सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक अहवाल आणि पीडितेचे जबाब यांचा तपशीलवार अभ्यास केला जात आहे. आरोपीविरोधात लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करून कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांचा प्रयत्न आहे.






