अबब! 45 वर्षांपूर्वी जप्त केलेले अमली पदार्थ नष्ट; पुणे पोलिसांची मोठी कामगिरी
पुण : पुणे लोहमार्ग पोलिसांनी गेल्या ४५ वर्षांपासून (१९८१-२०२५) विविध गुन्ह्यात जप्त केलेले तब्बल ३८५ किलो अमली पदार्थ नष्ट केले आहे. पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, मिरज अशा पाच लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कारवाई करून हे अमली पदार्थ जप्त केले होते. पुण्यातील अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे.
गेल्या काही वर्षात पुणे ड्रग्जचे केंद्र बनलेले आहे. पुण्यात गांजा तसेच इतर अमली पदार्थ येण्याचे प्रमुख मार्गापैकी एक हा रेल्वे मार्ग आहे. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांचे देखील अश्या तस्कारांवर नजर असते. वेळोवेळी लोहमार्ग पोलीस कारवाई करून आणलेला अमली पदार्थ जप्त केला आहे. असाच जप्त केलेला अमली पदार्थ हा न्यायालयाच्या परवानगीने नष्ट करण्यात आला आहे. यासाठी लोहमार्ग पोलीस अधीक्षक तुषार दोषी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली आहे.
पोलिसांनी तब्बल १९८१ पासून ते २०२५ कालवधीतील कारवाईतील हे अमली पदार्थ असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल ४५ वर्षांनी हा अमली पदार्थ नष्ट करण्यात आला आहे. यासाठी एकूण ९ तास १५ मिनिटांचा कालावधी लागला. महाराष्ट्र इन्व्हायरो प्रा. लि. या कंपनीमध्ये छोट्या १५ बॅग भरून भट्टीमध्ये कोळसा व विजेरी किरणांच्या साह्याने अमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले.