कल्याणीनगरमधील हॉटेलमध्ये चोरी करणारा अटकेत; दुचाकीसह तब्बल 'इतक्या' लाखांची रोकड जप्त
पुणे : कल्याणीनगर भागातील नामांकित हॉटेलच्या गल्ल्यातून तब्बल चार लाखांची रोकड चोरून पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून एक लाख ८० हजारांची रोकड, दुचाकी, मोबाईल असा २ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक आरोपी हा रेकॉर्डवरील आहे. सौरभ शिवाजी साबळे (२६, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत ३८ वर्षीय व्यक्तीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ३ डिसेंबर रोजी रात्री ही घटना घडली होती. गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चारचे वरिष्ठ निरीक्षक अजय वाघमारे, उपनिरीक्षक वैभव मगदूम, दिगंबर चव्हाण यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.
कल्याणीनगर भागातील कॉर्निच टॉवर्स इमारतीत बनाना लिफ नावाचे हॉटेल आहे. फिर्यादी हे या हॉटेलमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून आहेत. हॉटेलच्या गल्ल्यात चार लाखांची रोकड ठेवण्यात आली होती. मंगळवारी (दि.३) रात्री हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या दरवाज्यातून चोरटा आत शिरला. त्यानंतर गल्ला उचकटून आतील चार लाखांची रोकड चोरुन चोरटा पसार झाला.
गुन्ह्याचा समांतर तपास युनिट चारकडून सुरू होता. वरिष्ठ निरीक्षक अजय वाघमारे यांचे पथक आरोपीचा शोध घेत असताना गुन्ह्यातील संशयित हा हडपसर भागात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार साबळेला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता गाडीच्या डिकीत एक लाख ८० हजारांची रोकड मिळाली. उरलेली रक्कम त्याने मौजमजेसाठी खर्च केल्याचे सांगितले. युनिट चारच्या पथकाने आरोपीला अटक करून पुढील तपासासाठी येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
हे सुद्धा वाचा : खळबळजनक! पुण्यात खिडकी उचकटून चोरटे घरात घुसले, पण पुढे जे घडलं…
महिलांकडील मोबाइल लंपास
पुणे शहरात दुचाकीस्वार चोरट्यानी धुमाकूळ घातला असून, पादचारी महिलांकडील दागिने तसेच मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. प्रभात रस्त्यावरील हिरवाई उद्यान येथे दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेकडील मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील वाघोली भागात दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले, तर हडपसरमध्ये ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न झाला. सातत्याने या घटना घडत असताना पोलिसांना मात्र या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १५ परिसरातील सोसायटीत राहायला आहेत. त्या बुधवारी सायंकाळी प्रभात रस्ता परिसरातील हिरवाई उद्यान परिसरात चालायला गेल्या होत्या. तेथून त्या घरी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मोबाइलवर वहिनीचा फोन आला. त्यामुळे त्या मोबाइलवर बोलत पायी चालत असताना गल्ली क्रमांक १५ परिसरातील सिंबायोसिस शाळेसमोर महिलेच्या हातातील २० हजारांचा मोबाइल चोरून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. चोरट्यांनी हेल्मेट परिधान केले होते. सहायक पोलीस फौजदार राजेंद्र मारणे तपास करत आहेत.