शोरूममध्ये घुसून कामगारानेच केली चोरी; सुरक्षा रक्षकाचे हात- पाय बांधले अन्...
पुणे : वाकडेवाडीतील नामांकित दुचाकीच्या शोरुममधील सुरक्षा रक्षकाला कटरचा धाक दाखवून व त्याचे हातपाय बांधुन शोरुममधील ७ लाख ११ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने लुटणारा चोरटा शोरूममधीलच कामगार निघाला आहे. त्याला गुन्हे शाखेच्या युनिट चारने बेड्या ठोकल्या आहेत. प्रतिक भारत सावंत (वय २३, रा. सुळे पीजी महर्षीनगर, गुलटेकडी) असे चोरट्याचे नाव आहे.
प्रतिक हा याच शोरुममध्ये स्टोअर किपर म्हणून काम करतो. त्यानेच सुरक्षा रक्षकाला धाक दाखवून पैसे चोरुन नेले होते. दरम्यान, आपला हा रोकड चोरीचा प्रकार कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून दोन दिवस तो कामावर आला होता. त्यानंतर त्याने चार दिवस सुट्टी घेतली होती. याबाबत शोरुमच्या जनरल मॅनेजर यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमर कदम, उपनिरीक्षक वैभव मगदुम व त्यांच्या पथकाने केली.
वाकडेवाडी येथील नामांकित शोरुममध्ये राजू खान सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. १९ ऑगस्ट रोजी पहाट पावणे तीनच्या सुमारास त्यांना कटरचा धाक दाखवुन शोरुममध्ये नेले. त्यांचे हात बांधून कॅश काऊंटरच्या रुमची चावी घेऊन रुम उघडली. कपाटातील चावी घेऊन त्यातील ७ लाख ११ हजार रुपये घेऊन तो निघून गेला होता. पोलिसांना पाहणीनंतर चोरटा माहितीगार असावा असा संशय होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तांत्रिक विश्श्लेषणाचा आणि गोपनीय बातमीदारामार्फत आरोपीचा शोध घेत असताना पोलिसांना ही चोरी शोरुमध्ये काम करणार्या कामगाराने केली आहे अशी माहिती मिळाली. शोरुममधून प्रतिकचा फोटो मिळवून त्याचा शोध सुरु होता. तेव्हा महर्षीनगरतील गणपती मंदिराजवळ एका दुचाकी मोटारसायकलवर बसलेला तो दिसून आला. पोलिसांनी त्याला पकडून चौकशी केली असता, त्याने कबुली दिली
प्रतिक सावंत हा शोरुममध्ये स्टोअर किपर म्हणून काम करतो. त्याला कर्ज झाले होते. शोरुममध्ये पैसे असतात त्याची त्याला माहिती होती. कर्ज फेडण्यासाठी त्याने ही चोरी केली. चोरी केल्यानंतर संशय येऊ नये, म्हणून तो दोन दिवस कामाला आला होता. त्यानंतर त्याने 4 दिवस सुट्टी घेतली होती.