दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल बाळणाऱ्याला ठोकल्या बेड्या; पर्वती पोलिसांची मोठी कारवाई
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, खुनाचा प्रयत्न, गोळीबार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. गुन्हेगांरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. पोलिसही गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गस्त घालत आहेत. अशातच आता पर्वती पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल बाळगून फिरणार्या गुन्हेगाराला पर्वती पोलिसांनी अटक केली आहे.
त्याच्याकडून २ गावठी बनावटीचे पिस्टल, ४ मॅगझिन व २ जिवंत काडतुसे असे ७१ हजार ४०० रुपयांची शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. ओंमकार दीपक जाधव (वय २२, रा. साई सिद्धी चौक, आंबेगाव पठार) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. ओंमकार जाधव याच्याविरुद्ध २०१६ मध्ये वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. ओंमकार मध्यप्रदेशात गेलेला असताना ही पिस्टल विकत घेतली असून, स्वत:च्या संरक्षणासाठी ही पिस्टल बाळगत असल्याचे ओंमकार जाधव याचे म्हणणे आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक किरण पवार यांनी दिली.
पर्वती पोलीस ठाण्याचे तपास पथक परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमदार महेश मंडलिक व सद्दाम शेख यांना आरोपीबाबत माहिती मिळाली. या माहितीवरुन पोलिसांनी ओंमकार जाधव याला पकडले. त्याच्याकडून २ पिस्टल, २ जिवंत काडतुसे व ४ मॅगझिन जप्त केले आहेत. पर्वती पोलीस ठाण्यात ओंमकारविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, सद्दाम शेख, सूर्या जाधव, अमित चिव्हे, अमोल दबडे, श्रीकांत शिंदे, मनोज बनसोडे, नानासो खाडे, राकेश सुर्वे, स्वप्निल घुगे व किर्ती भोसले यांनी केली आहे.