Swargate Case: स्वारगेट अत्याचार प्रकरणात नवा ट्विस्ट; पुणे पोलिसांनी उचलले 'हे' मोठे पाऊल
पुणे: स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या तरुणीवरील बलात्कारप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. अजय मिसार यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी राज्य सरकारकडे पाठवला आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जाणार आहेत. त्यादृष्टीने पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास व इतर नियोजन केले जात आहे.
स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये पंधरा दिवसांपुर्वी (दि. २५ फेब्रुवारी) २६ वर्षीय तरुणीवर धमकावून जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना घडली. तीन दिवसानंतर यातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक केली. तो पोलीस कोठडीत आहे. बुधवारी त्याची पोलीस कोठडी संपत आहे. दरम्यान, याप्रकरणात आरोपीविरूद्ध जलदगतीने आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांकडून कार्यवाही केली जात आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ॲड. मिसार गुन्हेगारी कायद्यातील एक अनुभवी वकील असून, त्यांनी यापूर्वी अनेक गंभीर गुन्ह्यांत यशस्वीपणे बाजू मांडली आहे. त्यामुळे पोलिसांनी अॅड. मिसार यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करावी, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. लवकरच यावर अंतिम निर्णय अपेक्षित आहे.
पुढील कायदेशीर प्रक्रिया
– पोलिसांकडून न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.
– विशेष सरकारी वकील नियुक्तीनंतर न्यायालयीन सुनावणी जलदगतीने पार पडेल.
– आरोपींविरुद्ध कठोर शिक्षा सुनावण्यासाठी ठोस पुरावे न्यायालयासमोर मांडले जातील.
सरोदेंच्या नेमणुकीची मागणी
स्वारगेट बलात्कार प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. असीम सरोदे यांची नेमणूक करण्याची मागणी पीडित तरुणीने केली आहे. संदर्भात पीडितेने पुणे पोलीस आयुक्तांना पत्र पाठवले आहे. ‘माझ्या मर्जीवर झालेला अत्याचार समजून घेण्यात बहुसंख्य लोकांनी असंवेदनशीलता दाखवली, तेव्हा ॲड. सरोदे यांनी माझ्यावरील अन्याय संवेदनशीलतेने समजून घेतला. हा खटला ॲड. सरोदे यांच्या कायदेविषयक संस्थेने चालवावा. ते परिणामकारकपणे खटला चालवून मला न्याय मिळवून देतील, अशी खात्री आहे,’ असे पीडितेने पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. परंतु, पोलिसांनी अॅड. मिसार यांचे नाव पाठविले आहे.
Swargate Case : नराधम दत्तात्रय गाडेबाबत पुणे पोलीसांचा मोठा निर्णय; आता छेडछाडीला…
नराधम दत्तात्रय गाडेबाबत पुणे पोलीसांचा मोठा निर्णय
स्वारगेट बसस्थानकातील अत्याचारप्रकरणातला नराधम दत्तात्रय गाडेने महिला छेडछाड तसेच अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याची दाट शक्यता पोलिसांना आहे. त्याच्या छेडछाडीला कोणी बळी पडले असल्यास त्याबाबत गुन्हे शाखेकडे तक्रार करावी, असे आवाहन पुणे पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेकडे सोपविला आहे.