उरण : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विविध आमिषे,प्रलोभने दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असून उरण तालुक्यात याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. उरण तालुक्यातील सतीश गावंड यांनी केलेला चिटफंड घोटाळा संपूर्ण महाराष्ट्रात गाजला असून लाखो लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याला शिक्षा सुद्धा झाली. मात्र नागरिकांना अजूनही त्यांचे गुंतविलेले लाखो करोडो रुपये मिळाले नाहीत.सतीश गावंड चिटफंड प्रकरणात अनेकांचे संसार उध्वस्त झाले.अनेक जण भिकेला लागले.अनेक नागरिकांनी आपली संपूर्ण आयुष्यातील जमापुंजी आपल्या हातून घालवली. महाराष्ट्रातील सर्वात मोठा चिटफंड घोटाळा उरण तालुक्यात झाला.ही घटना ताजी असतानाच उरण तालुक्यातील सोनारी गावात एका शेअर मार्केट स्कीमच्या माध्यमातून दोघा भावांनी नागरिकांची मोठया प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे.
सोनारी गावात राहणारे अभिजीत दयानंद तांडेल व वेदक दयानंद तांडेल व त्यांचे साथीदार असलेले एजंट यांनी सोनारी गावातील तसेच उरण तालुक्यातील विविध गावात राहणारे शेकडो नागरिकांची अंदाजे चाळीस कोटी हुन अधिक रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.अभिजीत दयानंद तांडेल व वेदक दयानंद तांडेल हे दोघेही सख्खे भाऊ असून त्यांनी द सीक्रेट ट्रेडिंग स्किम नावाचे शेअर मार्केट चालवित असल्याचे सांगून या स्कीम मध्ये पैसे गुंतविल्यास आठ ते दहा टक्के नफा देण्याचे आश्वासन देत विविध नागरिकांना आमिष प्रलोभने दाखवले.
शेअर मार्केटवर आधारित ‘द सीक्रेट ट्रेडिंग’ स्कीम मध्ये पैसे गुंतवणूक केल्यास उत्तम नफा मिळवून देण्याचे आश्वासन नागरिकांना अभिजीत तांडेल व वेदक तांडेल यांनी दिले होते. नागरिकांनी आपली लाखो करोडो रुपये द सीक्रेट ट्रेडिंग स्कीम मध्ये गुंतवली होती .अनेक नागरिकांनी रोख हातात पैसे देऊन तर काही जणांनी त्यांना चेक किंवा बँक द्वारे पैसे दिले. कोणी ६७ लाख दिलेतर कोणी ७५ लाख तर कोणी १५ लाख रुपये दिले असे विविध लोकांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले आहेत.
शेकडोहुन जास्त लोकांनी अंदाजे चाळीस कोटीच्या आसपास पैशांची गुंतवणूक केली आहे. या शेअर मार्केटची स्कीमची माहिती देण्यासाठी अभिजीत तांडेल व वेदक तांडेल यांनी अनेक गावात त्यांच्या मर्जीतली विश्वासातील अशी माणसे घेऊन त्यांची एजंट म्हणून नेमणूक केली. या एजंट व्यक्तीने गावागावात या स्कीम ची माहिती देण्यास सुरुवात केली.एजेंट लोकांनी ग्राहक आणल्यास, पैसे गुंतविल्यास या एजेंट लोकांना कमिशन मिळायचे. लोकांची आर्थिक फसवणूक करून मिळालेल्या कमिशन मधून एजेंट लोकांनी लाखो करोडो रुपयांची बंगले बांधली आहेत.एजेंटचे काम करणाऱ्या सन्नी महेंद्र तांडेल(सोनारी ), हरेश रसाळ (चिर्ले ), अभिषेक अनिल ठाकूर (जसखार ), मयुरेश ठाकूर (सावरखार )यांनीही अनेक लोकांची फसवणूक केल्याची बाब उघड झाली आहे.सोनारी गावात व उरण तालुक्यात घडलेल्या या आर्थिक फसवणूकीत अभिजीत तांडेल व वेदक तांडेल यांच्या ईतकेच गुन्हा गावात नेमलेल्या एजंट लोकांनी केला आहे.
जेवढे अभिजीत तांडेल व वेदक तांडेल हे या घटनेस किंवा आर्थिक फसवणूकीस जबाबदार आहेत तेवढेच जबाबदार गावातील नेमलेले एजंट लोक आहेत. अभिजीत तांडेल, वेदक तांडेल यांनी व त्यांच्या एजंटनी हे स्कीम काही दिवस चालू ठेवली. कालांतराने जेव्हा लोक आपला परतावा, आपली रक्कम त्यांच्याकडे मागू लागले तेव्हा ते वेगवेगळी कारणे सांगून ती रक्कम देण्यास टाळाटाळ करायचे तसेच नागरिकांचे पैसे देण्याची वेळ आली की ते कुठेतरी निघून जायचे.फोन केला असता ते वेळीच फोन देखील उचलत नसत असा प्रकार नेहमी घडू लागला. वारंवार मागणी करून देखील आपला पैसा मिळत नसल्याने नागरिकांनी पैसा घेण्यासाठी त्यांच्या पाठीमागे तगादा लावला. मात्र नागरिकांना देण्यासाठी अभिजीत तांडेल,वेदक तांडेल यांच्याकडे पैसाच नसल्याने व नागरिकांमध्ये असंतोष झाल्याने अभिजीत तांडेल, वेदक तांडेल हे कुठेतरी बाहेरगावी निघून गेले मात्र गावात कधीच परतले नाहीत.शेअर मार्केट स्कीम प्रमाणे ८ ते १० टक्के नागरिकांना परतावा द्यायचे असल्याने एका एका नागरिकांचे करोड रुपये द्यायचे असल्याने या दोघांनीही परत आपला चेहरा नागरिकांना कधीही दाखवला नाही.
ज्याने ज्याने आपले लाखो करोडो रुपये या शेअर मार्केटच्या स्कीम मध्ये गुंतवले त्यांनी अनेक प्रयत्न केले मात्र त्यांना गुंतविलेले पैसे परत भेटत नसल्याने त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनेक नागरिकांनी सोनारी गावातील अभिजीत तांडेल, वेदक तांडेल यांनी केलेल्या आर्थिक फसवणूक विरोधात न्हावा शेवा पोलिस स्टेशनला धाव घेतली. काही नागरिकांनी फसवणूक झाल्या प्रकरणी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल केली आहे. अनेक नागरिकांची मोठया प्रमाणात फसवणूक झाली आहे. मात्र फसवणूक झाल्याचे सांगण्यास काही नागरिक पुढे येत नसल्याची बाब समोर आली आहे. आपले नाव माहित झाल्यास समाजात आपली बदनामी होईल, आपले नाव खराब होईल या भीतीपोटी अनेक नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नसल्याचे काही नागरिकांनी सांगितले.
सोनारी गावातील अभिजीत दयानंद तांडेल, वेदक दयानंद तांडेल या दोघा सख्ख्या भावांनी शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक सांगून हेतूपरस्पर, जाणूनबुजून नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचे लक्षात येताच पोलीस प्रशासनातर्फे सदर दोघांवर (दोघा भावांवर )भारतीय न्याय संहिता (B.N.S )२०२३ कायद्यान्वये कलम ३१८(४), ३१६(२), ३(५), महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय हित संबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ कलम ३ अन्वये न्हावा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दयानंद तांडेल व वेदक तांडेल हे दोघे भाऊ आपल्याला अटक होईल व आपले पितळ उघडे पडेल या भीतीने गायब झाले आहेत. ते कुठे लपले आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत. सदर दोघेही व्यक्ती कोर्टाच्या माध्यमातून जामीन घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते. मात्र न्यायालयाने अशा फसवणूक करणाऱ्या व जनतेच्या नागरिकांच्या आयुष्याची राख रांगोळी करणाऱ्या व्यक्तींना जामीन देऊ नये त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. न्हावा शेवा पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेत जातीने लक्ष देऊन तपास करावा व आर्थिक फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पीडित नागरिकांनी व जनतेने केली आहे. उरण मध्ये अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी पैसे डबल करण्याचे आमिष, प्रलोभने दाखवून नागरिकांचे आर्थिक फसवणूक झाल्याचे अनेकदा उघड झाले आहे. तरीसुद्धा नागरिक अशा अवैध व बेकायदेशीर व्यवहारावर विश्वास ठेवतात कसा ? असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणात एका एका व्यक्तीने लाखो करोडो रुपयांची गुंतवणूक केल्याने त्यांची आयुष्य भरची कमाई ही अशा फ्रॉड, बेकायदेशीर अवैध स्कीम मध्ये गुंतवून वाया गेल्याने आर्थिक फसवणूक झालेल्या नागरिकांचे संपूर्ण जीवन उध्वस्त झाले आहे.त्यामुळे पोलीस प्रशासनाने त्वरित पीडित नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
सोनारी गावात नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याने आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास सुरु आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
– किशोर गायके, सहाय्यक पोलीस आयुक्त, न्हावा शेवा बंदर विभाग
सोनारी गावातील आर्थिक फसवणूक संदर्भात नागरिकांना न्याय देण्यासाठी पोलीस प्रशासनामार्फत तपास सुरु आहे. ज्यांची फसवणूक झाली त्यांना न्याय मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
– दिपक सुर्वे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, न्हावा शेवा पोलीस स्टेशन
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वा नुसार तपास कार्य सुरु आहे. अभिजित तांडेल व वेदक तांडेल यांच्या विरोधात न्हावा शेवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाला असल्याने अभिजित तांडेल व वेदक तांडेल यांना कायदेशीर रित्या नोटीस पाठवली आहे. आतापर्यंत एकूण ९२ लाखाची फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाली आहे.कोणीही पैसे डबल करण्याचे किंवा जास्त नफा मिळवून देण्याचे कोणी आश्वासन,आमिष दाखवित असेल तर अशा गोष्टी पासून सर्वांनी लांब रहावे. अशा घटना पासून सावध रहावे कारण अशा जास्त नफेच्या व्यवहारातून आर्थिक फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून पैशाच्या बाबतीत कोणतेही व्यवहार करताना नागरिकांनी व्यवहार जपून, विचार करून करावे.
– मनोज गुंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक, न्हावा शेवा पोलीस स्टेशन