दापोली/निसार शेख : ऐन दिवाळीच्या काळात रत्नागिरीतील दापोली तालुक्यात वाळूमाफियांचा गैरप्रकार सुरु असल्याचं दिसून आलं. मात्र स्थानिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. चोरट्या वाळूने भरलेला डंपर ग्रामस्थांनी अडवून महसूल प्रशासनाच्या ताब्यात दिला. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बेकायदा वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिलेले असतानाही दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडीत पंपाच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. या प्रकाराकडे स्थानिक महसूल विभाग कानाडोळा करत असल्याची नागरिकांची तीव्र नाराजी असून, आता ग्रामस्थांनीच या विरोधात पाऊल उचलले आहे.
20 ऑक्टोबरला सकाळी सुमारास देहेण गावात आंजर्ले ते कादिवली रस्त्यावरून जात असलेला वाळूने भरलेला डंपर ग्रामस्थांनी थांबवून ठेवला. सदर डंपरमध्ये चोरटी वाळू वाहतूक होत असल्याचा संशय आल्यामुळे गावकऱ्यांनी त्वरित महसूल विभागाला माहिती दिली.या घटनेची माहिती तहसीलदार अर्चना बोंबे यांच्यापर्यंत पोहोचवल्यानंतर त्यांनी मंडळ अधिकारी अंभोरे यांना घटनास्थळी पाठवले. जवळपास ३ तासांनंतर महसूल अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि डंपरची तपासणी करत पंचनामा केला. त्यानंतर सदर डंपर ताब्यात घेत दापोली तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आला आहे.तहसीलदार अर्चना बोंबे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “डंपरवर दंडात्मक कारवाई दिवाळीच्या सुटीनंतर करण्यात येईल. पोलीस यंत्रणेशी समन्वय साधून पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात येईल.”
दरम्यान, आंजर्ले खाडीत मागील अनेक महिन्यांपासून पावसाळ्याच्या काळातही पंपाच्या सहाय्याने शेकडो ब्रास वाळूचा बेकायदा उपसा सुरू आहे. यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असूनही महसूल विभाग किंवा इतर संबंधित यंत्रणांकडून यावर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, “बेकायदा वाळू उपशाला कोणाचा वरदहस्त आहे?” असा सवाल विचारला जात आहे. विशेष म्हणजे राज्याचे महसूल राज्यमंत्री हे या मतदारसंघाचे प्रतिनिधी असूनही त्यांच्या तालुक्यातच सर्रास वाळू उपसा होत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.राज्य सरकारकडून तहसीलदारांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत की, बेकायदा वाळू उपसा आढळल्यास कारवाई करावी अन्यथा संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल. मात्र प्रत्यक्षात याचे पालन होताना दिसत नसल्याने, महसूल खात्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.