संग्रहित फोटो
पुण्यात कायद्याचे रक्षकच असुरक्षित?
पुणे शहरात पोलिसांवर हल्ले सुरुच
2 वर्षातील धक्कादायक आकडा समोर
पुणे : भयमुक्त समाज अन् शहर ठेवण्यासाठी दिवस-रात्र तैनात असलेले पोलिसच आज असुरक्षिततेच्या छायेत उभे असून, गेल्या दोन वर्षात शहरात ७५ पोलिसांवर हल्ल्यांची नोंद झाली आहे. रस्त्यावर कायदा राखणाऱ्या व गुन्हेगारांवर उभ्या असलेल्या पोलिसांवरच हात उचलण्याचे प्रकार वाढल्याने पोलिस दलात असंतोष आणि नाराजीचे वातावरण आहे. “पोलिसच सुरक्षित नसतील, तर नागरिक किती सुरक्षित ?” असा प्रश्न या पार्श्वभूमीवर उपस्थित होत आहे.
गेल्या १५ दिवसात शहरात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले आहेत. आपले कर्तव्य संपवून मध्यरात्री घरी निघालेल्या पोलिसांवर हे हल्ले झाले आहेत. तत्कालीक कारण असले तरी पोलिसांवर हात उचलणे म्हणजे आता सहजतेचे वाटू लागले आहे. नागरिक भिडभाड न बाळगता तसेच आदरयुक्त भिती न बाळगता पोलिसांवरच हात उचलू लागले आहेत. त्यामुळेच पोलिसांचा दरारा संपला का ? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
मार्केटयार्डमध्ये एक ट्रक वेगात होता. तो इतर वाहनांना धडकण्याचा धोका निर्माण करत होता. काही वाहनचालकांनी ट्रक गेट क्रमांक ९ वर अडवला. त्या ठिकाणी चालकास जमावाने मारहाण करण्याचा प्रयत्न केला असता, साळुखे यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली. पण, नतंर चालकाने इतरांना बोलवून पोलिसावरच हल्ला केला. त्यांना बेदम मारहाण केली. पुन्हा गाडी चालवू नको असे म्हणल्यावरून हा वाद झाला. त्यापुर्वी कर्मचारी मध्यरात्री एका पडीक खासगी जमनीवर लघुशंका करताना जमीन मालकाशी वाद झाल्यानंतर बेदम मारहाण झाली. त्यापुर्वी लॉ कॉलेज रस्त्यावर एका पोलिसाला दोन तरुणांनी बेदम मारहाण केली. या घटना केवळ पंधरा दिवसांमधील आहेत. वाहतूक पोलिसांवर सातत्याने हल्ल्याचे प्रकार घडत आहेत.
दोन वर्षात ७५ पोलिसांवर हल्ले झाले असून, हल्ल्यांपैकी बहुतेक प्रकरणे वाहतूक कारवाईदरम्यान, गुन्हेगार अटक मोहिमेत किंवा मद्यधुंद अवस्थेत नियम मोडणाऱ्यांकडून झाल्याचे सांगितले जाते. काही घटनांमध्ये पोलिसांवर दगडफेक, शाब्दिक शिवीगाळ, ढकलाढकली तर कधी सरळ शस्त्राने हल्ले झाले आहेत.
कर्तव्य बजावताना शिक्षेची भावना
कायद्याचे पालन करण्याऐवजी विरोध करणे, व्हिडिओ काढणे आणि सोशल मीडियावर पोलिसांना बदनाम करणे हा नवीन ‘ट्रेंड’ झाला आहे. अशा घटनांमुळे पोलिसांचे मनोबल खच्ची होत असून, दलावर मानसिक ताण वाढत आहे. पुण्यातील वाढते गुन्हेगारी नेटवर्क, वाहतुकीतील गोंधळ व सततच्या चौदा-चौदा तासांच्या ड्युटीने पोलिस दलावर आधीच प्रचंड दबाव आहे. त्यातच असे हल्ले म्हणजे “कर्तव्य बजावताना शिक्षा भोगावी लागते” अशी भावना काहींनी व्यक्त केली आहे.
‘हॉट स्प्रिंग’ची घटना
२१ ऑक्टोबर १९५९ मध्ये लडाखच्या ‘हॉट स्प्रिंग’ येथे सशस्त्र चीनी सैन्याच्या हल्ल्यात दहा शूर पोलिसांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तेव्हापासून दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलिस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो. देशासाठी आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांचे स्मरण ठेवण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी पोलिस स्मृतिदिन साजरा केला जातो.