
अलोरे जिल्हा परिषद गटात दुरंगी तर शिरगाव गटात तिरंगी लढत; युती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस सामना रंगणार
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील अलोरे जिल्हा परिषद गटात दुरंगी तर शिरगाव जिल्हा परिषद गटात तिरंगी लढत होणार आहे. अलोरे गटात भाजप-शिवसेना युती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष असा सामना रंगणार आहे. तर शिरगाव गटात युती, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) पक्ष अशी तिहेरी लढत होणार आहे. अलोरे गणात तिहेरी तर शिरगाव, पिंपळीखुर्द, वेहेळे गणात दुहेरी सामना होणार आहे. या गट व गणातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
चिपळूण तालुक्यात ९ जिल्हा परिषद गट तर १८ पंचायत समिती गण असून पंचायत समितीवर आपली सत्ता स्थापन करण्याबरोबरच जिल्हा परिषदेवर जास्तीत जास्त सदस्य पाठवण्यासाठी युती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) पक्ष व शिवसेना उबाठा यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. अलोरे जिल्हा परिषद गटात युती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) पक्ष असा दुहेरी सामना होत आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे यांच्या पत्नी विनया झगडे या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. तर चिपळूण पंचायत समितीचे माजी सदस्य रमेश राणे यांच्या विवाहित कन्या कोळकेवाडी येथील गायत्री गणेश कदम या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून निवडणूक लढवीत आहेत. या गटात होत असलेली निवडणूक अनुभवी नेतृत्वाच्या माध्यमातून होत आहे. यापूर्वी अलोरे जिल्हा परिषद गटात विनोद झगडे व रमेश राणे यांच्यात सामना रंगला होता. तर आता राणे यांची विवाहित मुलगी तर झगडे यांची पत्नी आमने-सामने उभ्या ठाकल्या आहेत. यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
अलोरे जिल्हा परिषद गटांतर्गत अलोरे गणात तिरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे निलेश कदम, भाजपा शिवसेना युतीचे तथा माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे, शिवसेना उबाठा पक्षाकडून विलास तांदळे या तिघांमध्ये सामना होत असून विनोद झगडे यांनी यापूर्वी जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक लढवली होती. यामुळे झगडे यांच्याकडे निवडणुकीचा अनुभव असला तरी निलेश कदम यांनी या गटात जनतेशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या युवक चिपळूण तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत पक्ष वाढीसाठी देखील योगदान दिले आहे. यामुळे कदम व झगडे यांच्यातच खरी लढत होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
पिंपळी खुर्द गणात पिंपळीखुर्दचे माजी सरपंच सुनील देवरुखकर यांच्या पत्नी सुप्रिया देवरुखकर निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) पक्षाकडून पूर्वा रुपेश भोसले या निवडणूक लढवीत आहेत. या गणात दुरंगी लढत होत असून दोन्ही उमेदवारांनी गणातील गावागावात मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटीवर भर देत चांगलीच रंगत आणली आहे.
शिरगाव गटात शिवसेना-भाजप युतीतर्फे अडरे येथील दीक्षा दत्ता कांबळी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे कान्हे येथील अमिता अरुण मोडक तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून नेहा सुरेश रहाटे या तिघी निवडणूक रिंगणात उतरल्या असून इथे धनुष्यबाण विरुद्ध घड्याळ असाच सामना रंगणार असल्याचे बोलले जात आहे.
शिरगाव गणात दुरंगी लढत होत असून शिवसेना-भाजप युतीतर्फे ॲड. नयना पवार तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) पक्षाकडून स्नेहा साळवी यांच्यात लढत होत आहे. ॲड. नयना पवार या सहकार, विधी क्षेत्रात कार्यरत आहेत. प्रथमच या निवडणूक रिंगणात उतरल्या असल्या तरी नयना यांचा जनतेशी संपर्क राहिला आहे. तर दुसऱ्या उमेदवार स्नेहा साळवी यांनी पोफळी गावचे सरपंचपद भूषवले असून विकासकामांसह प्रशासनाचा अनुभव गाठीशी आहे. यामुळे या दोघांमध्ये कडवी लढत होणार असल्याचे सांगितले जात आहे. ॲड. नयना पवार यांनी या गणातील गावागावातील प्रत्येक मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटीवर भर देत जोरदार मुसंडी मारली आहे.
वेहेळे गणात देखील दुरंगी लढत होत असून माजी उपसभापती सूर्यकांत खेतले पुन्हा एकदा आपले नशीब आजमावत आहेत. तर शिवसेना- भाजप युतीतर्फे वेहेळे गावातील राम राजेशिर्के निवडणूक रिंगणात उतरले आहेत. युतीच्या उमेदवारांसाठी भाजप नेते प्रशांत यादव, शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी बैठकांवर भर देत उमेदवारांच्या विजयासाठी कंबर कसली आहे. यात ते यशस्वी होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसेच शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्तम समन्वय असल्याने याचा फायदा उमेदवारांना होणार असल्याचे बोलले जात आहे.