विद्यार्थ्याच्या दोन गटांतील राड्यानंतर रेक्टरकडून विद्यार्थ्यांला पाईपने मारहाण
कोल्हापूर : जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील शामराव पाटील निवासी व अनिवासी शिक्षण संस्थेत वर्चस्व वादातून विद्यार्थांच्या दोन गटात हाणामारी झाली. शाळेच्या आवारात झालेल्या या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या हाणामारीनंतर रेक्टर राहुल कोळी यांनी दहावीच्या विद्यार्थ्याला पाईपने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी आरोपी रेक्टरविरुद्ध पेठ वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी विद्यार्थी इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असून हॉस्टेलमध्येच राहतो. ७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी शाळेत एका मुलगा व त्याचे दोन वर्गमित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा वाद वर्चस्व वादातून झाल्याचे समजते. यामध्ये क्रिकेटची बॅट तसेच लाथाबुक्यांनी प्रचंड मारहाण होत असल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. मारहाण होताना विद्यार्थी जिवाच्या आकांताने ओरडत असल्याचे ही दिसून आले.
दरम्यान, या वादाची माहिती मिळताच रेक्टर कोळी यांनी दोन्ही विद्यार्थ्यांना ताकीद देऊन सोडून दिले होते. मात्र, याच वादाचा राग मनात धरून रेक्टर कोळी याने दुसऱ्याच दिवशी विद्यार्थ्याला मारहाण केल्याचे समोर आले आहे. संध्याकाळी पीटी परेडच्या वेळी रेक्टर कोळी यांनी जखमी विद्यार्थ्याला सर्वांसमोर स्टेजवर बोलावून घेतले. त्यानंतर त्यांच्या हातातील पीव्हीसी पाईपने विद्यार्थ्याच्या पार्श्वभागावर तसेच डोक्यावर मारहाण केली. या मारहाणीमुळे विद्यार्थ्याला तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेदेखील वाचा : पुणे शहरातील बड्या व्यावसायिकाची फसवणूक; तब्बल 104 कोटींना घातला गंडा
घटनेनंतर विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी शाळा प्रशासनाशी संपर्क साधला. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने फिर्यादी पालकांनी पेठ वडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेत आरोपी रेक्टर कोळी विरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिसरात एकच खळबळ
या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अल्पवयीन विद्यार्थ्यावर शिक्षकानेच हात उचलल्याने पालकांमध्ये रोष आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी रेक्टरवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी प्राथमिक तपास सुरू केला असून विद्यार्थ्याचे वैद्यकीय अहवाल, साक्षीदारांचे जबाब व शाळेतील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात येणार आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पवार करत आहेत.