crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
दिल्ली येथील लाला किल्ला परिसरात मंगळवारी एक जबरी चोरी झाल्याचे समोर आले आहे. एक कोटी रुपयांचा कलश चोरी झाल्याचे समोर आले आहे. लाल किल्ला परिसरात जैन समाजाचे एक धार्मिक अनुष्ठान सुरु होते. सगळे जण धार्मिक कार्यक्रमात व्यग्र असतानाच चोरांनी ७६० ग्राम सोने, १५० ग्राम हिरे, माणिक
मोती, पन्ना यांनी मढवलेल्या कलशावर हात साफ केला. त्यांनी अशी हात सफाई केली की चोरीनंतर बराच वेळ अनेकांची ही घटना लक्षात सुद्धा आली नाही. काही वेळा नंतर कलश न दिसल्याने खळबळ उडाली. तर येथील सुरक्षा व्यवस्थेवरून आता प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरूवात केली आहे.
नेमकं काय घडलं?
दिल्ली येथील लाल किल्ला परिसरात जैन समाजाचे धार्मिक अनुष्ठान सुरू होते. या कार्यक्रमासाठी विविध रत्नआभुषणांनी, सोन्याने मढवलेला कलश ठेवण्यात आला होता. त्याची बाजारातील किंमत एक कोटींच्या घरात होती. सर्वच जण धार्मिक कार्यक्रमात व्यग्र होते. काहींची पूजेची लगबग सुरू होती. त्यावेळी चोरट्यांनी संधी साधली. त्यांनी हा कलश चोरला. हा कलश 760 ग्रॅम सोने, हिरे, माणिक मोती आणि पन्ना यांनी मढवलेला होता. पोलिसांना चोरीच्या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या परिसरात लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात काही व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. पोलिसांनी या व्यक्तींची ओळख पटवल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी आयोजक आणि जैन समुदायाला या चोरांना लवकरच पकडण्याचे आश्वासन दिले. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, 2023 अंतर्गत 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
सीसीटीव्हीत चोरटे कैद
व्यापारी आणि व्यावसायिक सुधीर जैन हे रोज पूजा करून हा कलश या कार्यक्रमात घेऊन येतात. मंगळवारी या कार्यक्रमाला अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनी भेट दिली. त्यांच्या स्वागत कार्यक्रमात आयोजक व्यग्र झाले. त्याचवेळी संधी साधत चोरट्यांनी कलश चोरला. जैन समुदायाकडून हा कार्यक्रम 15 ऑगस्ट पासून सुरू आहे. तो 9 सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यापूर्वीच चोरट्यांनी असं कांड केलं आहे. सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहेत. त्यांची ओळख पटवण्यात आली आहे. लवकरच ते अटकेत असतील आणि कलशही ताब्यात येईल असा पोलिसांचा दावा आहे.