मुंबई: वक्फ (दुरुस्ती) विधेयकावर राज्यसभेत झालेल्या चर्चेदरम्यान शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रफुल्ल पटेल यांच्यावर तीव्र टीका केली.
“मला पवार साहेबांनी माहिती दिली असं सांगणाऱ्या प्रफुल्ल पटेलांनी जर खरंच पवार साहेबांकडून माहिती घ्यायची वेळ साधली असती, तर त्याच पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून गेले नसते,” असा टोला राऊत यांनी लगावला. प्रफुल्ल पटेल यांचा थेट उल्लेख करत राऊत म्हणाले, “हे गृहस्थ व्यापारी आहेत, डरपोक आहेत. मला अशा लोकांशी बोलायचंही नाही.” सभागृहातील प्रसंगाची आठवण करून देताना त्यांनी सांगितले की, “त्यांचा माईक चालू होता आणि आम्ही विरोधी पक्ष असल्यामुळे आमचा माईक बंद होता. नाहीतर माझं उत्तर रेकॉर्डवर आलं असतं. मी तिथेच त्यांना उत्तर दिलं आहे.”
भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया हल्ल्यांवर निशाणा साधत राऊत म्हणाले, “बीजेपीच्या आयटी सेलने प्रफुल्ल पटेल यांचं जणू एखादं रणांगण जिंकल्यासारखं चित्र रंगवलं. जणू ते दुसऱ्या महायुद्धात जर्मनी जाऊन लढून आले आणि मग भंडाऱ्यात उतरले. हे सगळं हास्यास्पद आहे. “तुम्ही माझं वक्तव्य कापाल, पण हे सगळे गांडू आहेत. डरपोक लोक आमच्याशी काय लढणार?” असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
रंग बदलल्याच्या आरोपांवर राऊत भडकले. ते म्हणाले, “रंग कोण बदलतोय? आम्ही आजही आमच्या व्यासपीठावर, बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत ठामपणे उभे आहोत. पळून कोण गेला? ज्यांनी बापाच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांचं खरं स्वरूप सर्वांना माहीत आहे. “वेळ पडली तर माझ्या गाडीत डिकीत सगळं आहे. माझ्या नादाला लागू नका. शिवसेनेच्या नादाला लागू नका. गद्दार शिंदे गट आणि गद्दार राष्ट्रवादी गट यांनी सावध राहावं, असा खुला इशाराही त्यांनी यावेळी दिला.
तसेच, “तुम्ही तिकडे सुखी आहात ना? भांडी घासताय, बूट पॉलिश करताय, मग करत राहा. आमच्या स्वाभिमानाशी खेळायचा प्रयत्न करू नका. आम्ही स्वाभिमानी आहोत. आम्ही दिल्लीत जाऊन कोणाचे बूट चाटत नाही. आम्ही सत्तेचे हपापलेले नाही,’अशी जळजळीत टीकाही त्यांनी यावेळी केली.
खासदार संजय राऊत यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता त्यांनी सडकून टीका केली. कोकाटे यांच्या अलीकडील वक्तव्यावर टीका करत राऊत म्हणाले, “माणिकराव कोकाटे म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झाले आहेत. त्यांनी राजकारणात अनेक वर्षं काढली आहेत, परंतु शेतकऱ्यांना दुखावणारी विधाने करणं हे त्यांच्या अनुभवी पदाला शोभत नाही. अजित पवार यांच्यावरही राऊत यांनी निशाणा साधला. अजित पवारांनी जर प्रफुल्ल पटेल आणि माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या लोकांना लगाम घातला नाही, तर त्यांचं काही खरं नाही,” असा इशारा त्यांनी दिला.