crime (फोटो सौजन्य - social media)
हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर गावामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतमजुरीचे पैसे मागितल्याचा कारणावरून मजुराला तीन ते चार जणांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ६०० रुपये शेतमजुरीचे मागितले म्हणून लाठ्याकाठ्या आणि लोखंडी रॉडसह लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे.
शेअर बाजारात गुंतवणूकीच्या आमिषाने फसवणूक; तब्बल सव्वा कोटींना घातला गंडा
नेमकं काय प्रकरण?
पीडित शेतमजुराचे नाव आनंद मोरे असे आहे. काही दिवसापूर्वी उमर गावातील शेतकरी दिलीप बोंगाणे यांच्या शेतामध्ये हळद शिजवण्याचं काम करण्यासाठी आनंद मोरे गेले होते. त्याच कामाचे थकीत असलेले मजुरीचे ६०० रुपये मागण्यासाठी आनंद मोरे हे त्यांच्या शिरदशहापूर येथील दुकानावर गेले होते. शेतकरी दिलीप बोंगाणे यांनी मजुरीचे पैसे देण्यासाठी टाळाटाळ केली. मोरे यांनी त्यांना विनंती केली. परंतु पैसे मागण्याचा तगादा का लावतोयस असं म्हणत आनंद मोरे यांना बोंगणे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी मिळून काठी लोखंडी रॉडसह लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे.
या मारहाणीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तीन ते चार जण आनंद मोरे यांना बेदम मारतांना पाहायला मिळत आहे. या प्रकरणानंतर मोरे यांनी औंढा नागनाथ पोलीस ठाणे येथे तक्रार दिली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करत हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवले आहे. आनंद मोरे यांच्यावर हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात येत आहे.