संग्रहित फोटो
पुणे : ‘शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास ३० ते ३५ टक्के परतावा मिळेल,’ असे आमिष दाखवून अनेकांची १ कोटी २१ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी धायरीतील ३४ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. त्यावरून नांदेडसिटी पोलिसांत गुजरातमधील प्रियांक दवे, अभयकुमार दवे, मित दवे, सुमित बोराणा, झील जैन, अयुष सेवक, जय पटेल, पंकज जैन, पिंटू जानी आणि निकुंज जानी (रा. लुणावडा व गोध्रा, गुजरात) अशा नावाच्या व्यक्तींवर गुन्हा नोदंवला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शेअर बाजारात मोठा परतावा मिळण्याचे आमिष दाखवून तक्रारदार तरुणाकडून ३३ लाख ७९ हजार रुपये रोखीने व ऑनलाइन स्वरुपात घेतले. सुरुवातीला काही महिने तरूणाला ३० ते ३५ टक्के परतावा दिला. दरम्यान, तक्रारदाराच्या ओळखीतील इतर लोकांकडूनही शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ८८ लाख १९ हजार रुपये जमा केले होते. मात्र, सप्टेंबर २०२४ नंतर कोणताही परतावा न देता मूळ गुंतवणूक रक्कमही परत केली नाही. गुंतवणुकीची रक्कम परत देण्यात येईल, असे भासवण्यासाठी आरोपींनी खोटी व बनावट कागदपत्रेही तयार केली. तक्रारदार व त्याच्या ओळखीतील इतर लोकांनी गुजरात येथे जाऊन आरोपींची प्रत्यक्ष भेट घेतली. गुंतवणुकीच्या रकमेबाबत विचारणा केली, आरोपींनी त्यांना ‘पुन्हा पैसे मागितले तर जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
कोथरुडमधील एकाची साडेनऊ लाखांची फसवणूक
डहाणूकर कॉलनी येथे राहणाऱ्या ६९ वर्षीय व्यक्तीला मोबाईलवर खास क्रेडिट कार्ड योजनेची जाहिरात दिसली. तक्रारदाराने ती जाहिरात उघडली. त्यातील फॉर्ममध्ये आवश्यक सर्व माहिती नमूद केली. नंतर तक्रारदाराला ‘बँक ऑफ इंडिया’च्या नावाने संपर्क करण्यात आला. समोरील व्यक्तीने तक्रारदाराला ‘तुमचे क्रेडिट कार्ड मंजूर झाले आहे. पुढील प्रक्रियेसाठी वैयक्तिक माहिती द्यावी लागेल,’असे सांगितले. नंतर सायबर चोरट्यांनी तक्रारदाराकडून सर्व वैयक्तिक माहिती घेतली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तक्रारदार यांच्या पत्नीच्या व्हॉट्सअॅप नंबरवर व्हिडिओ कॉल केला. अॅडमिनिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन आवश्यक असल्याचे सांगून एपीके फाइल पाठवली. त्यांना त्यावर क्लिक करण्यास सांगितले. त्याद्वारे सायबर चोरट्यांनी त्यांच्या फोनचा ताबा घेऊन त्यांच्या खात्यातील सुमारे साडेनऊ लाख रुपये काढून घेतले.