
Vanraj Andekar: वनराज आंदेकरांच्या हत्येत बहिणीचा सहभाग निष्पन्न; आतापर्यंत २२ जणांना अटक
पुणे: माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येत ‘कोमकर’ कुटूंबाचा सहभाग समोर आला आहे. त्यानुसार, पोलिसांनी टोळीप्रमुख सोमा उर्फ सोमनाथ गायकवाड आणि कोमकर यांच्यामधील महत्वाची भूमिका बजावणाऱ्या एका गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडे केलेल्या तपासातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. दरम्यान, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रसाद पांडुरंग बेल्हेकर (वय ३३, नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. भेल्हेकरला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पंधरा दिवसांपुर्वी (१ सप्टेंबर) माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत २२ जणांना अटक केली आहे. त्यात वनराज आंदेकर यांची बहिण संजीवनी, तिचा पती जयंत व इतर कोमकर कुटूंबितील अशा चौघांना अटक केली आहे. हत्येनंतर वनराज यांचे वडिल सुर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांनी प्रमुख आरोपींमध्ये नाव दिले होते.
परंतु, सोमा गायकवाडच्या टोळीने टोळी युद्धातून तसेच अनिकेत आखाडे याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हत्या केल्याचे सांगितले जात होते. तशी कबूली देखील आरोपी देत होते. मात्र, कोमकर कुटूंबाचा सहभाग नाही, असे बोलले जात होते. परंतु, पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात कुटूंबाचे पहिल्यापासून या हत्याप्रकरणात सहभाग असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
कोमकरवर आरोपींच्या जामीनाची जबाबदारी
गणेश कोमकर तसेच, सोमा गायकवाड, अनिकेत दुधभाते व प्रसाद बेल्हेकर यांची गेल्या काही महिन्यांमध्ये चार वेळा भेटी झाल्या आहेत. या भेटीत हत्येसंदंर्भात बोलणी झाली असून, कटात चौघेही प्रमुख भूमिकेत आहेत. गणेश कोमकर याच्यावर वनराज याचा खून करणाऱ्या आरोपींच्या जामीनाची जबाबदारी दिली होती. ती कोमकरने घेतली देखील होती. लागेल तो पैसा व इतर खर्च तो देणार होता.
तीन अल्पवयीन आरोपींमधील एक सज्ञान
आंदेकर हत्याप्रकरणात पोलिसांनी २२ आरोपी पकडले. त्यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश होता. मात्र, त्यातील एक आरोपी हा सज्ञान असल्याचे समोर आले आहे. आता पोलिसांनी या अल्पवयीन म्हणून घेणाऱ्या श्री तात्यासाहेब गायकवाड (वय १८) याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.