
लग्नाच्या वादात वडिलांचा खून
भंडारा : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडताना दिसत आहे. असे असताना भंडारा जिल्ह्यात लग्नाच्या वादात वडिलांचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आधली गावात लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याच्या कारणावरून मुलाने वडिलांशी वाद घालून त्यांचा खून केला.
लाखांदूर तालुक्यातील विरली (बु) येथील कालव्यावर पैशांच्या वादातून झालेल्या खुनाच्या घटनेला अवघा पंधरवडा लोटत नाही तोच लाखांदूर तालुका पुन्हा एका धक्कादायक घटनेने हादरला आहे. आधली गावात लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याच्या कारणावरून मुलाने वडिलांशी वाद घालून त्यांचा खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. ७) रात्री आठच्या सुमारास घडली.
पुरुषोत्तम कुंभलवार (वय ५१, रा. आधली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पुरुषोत्तमच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी मुलगा प्रदीप पुरुषोत्तम कुंभलवार (वय ३३) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून अटक केली आहे. घटनेच्या रात्री मृतक, आरोपी आणि फिर्यादी पत्नी तिघेही घरी जेवणानंतर बसले होते. यावेळी आरोपी मुलाने लग्नाच्या विषयावरून वडिलांशी वाद घातला. गेल्या काही वर्षांपासून लग्नासाठी मुलगी मिळत नसल्यामुळे संतापलेल्या मुलाने वडिलांच्या डोक्यावर विटेचा तुकडा फेकून मारला.
दरम्यान, पत्नीने रक्तबंबाळ अवस्थेत पतीला पाहून स्थानिक तंटामुक्त समिती अध्यक्षांकडे धाव घेत रुग्णवाहिका बोलावली. जखमी पुरुषोत्तम कुंभलवार यांना लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. पत्नीच्या तक्रारीनंतर लाखांदूर पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून अटक केली. याप्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे.
संभाजीनगरमध्येही किरकोळ कारणावरून हल्ला
किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडताना दिसत आहे. असे असताना छत्रपती संभाजीनगर किरकोळ वादातून तरुणावर हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. ‘तू भेटायला का आला नाही’ असे म्हणत तरुणाला दगडाने मारहाण करुन डोके फोडले. ही घटना गुरुवारी (दि.६) रात्री साडेनऊच्या सुमारास गोमटेश मार्केट परिसरात घडली.