उघड्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांवर तात्काळ कारवाई करा, शैलेश पाटील यांची मागणी (फोटो सौजन्य-X)
ठाणे : दिवा शहरातील गजबजलेला परिसर असलेल्या दिवा चौक परिसरातील दारू दुकानांसमोर पोलीस प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. उघड्यावर दारू पिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यामुळे याचा नाहक त्रास पादचारी महिला, लहान मुले तसेच जेष्ठ नागरिकांना होत असल्याच्या तक्रारी माजी नगरसेवक शैलेश पाटील यांच्या कार्यालयात येऊ लागल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आज (16 जुलै) शैलेश पाटील यांनी तात्काळ मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना निवेदन दिले. उघड्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांवर कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी दारू विक्रीची दुकाने आहेत, मात्र दिवा परिसरातील दुकानांभोवती दिसणारा बिनधास्त दारू सेवनाचा धुमाकूळ दिसून येतो. त्याचबरोबर अश्लीलतेचा नाहक त्रास सर्व सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. सदर दारू दुकानदार दारू विक्रीबरोबरच सोडा, पाणी, चणे, फुटाणे, फरसाण यांसारख्या ‘पूरक’ वस्तू विकून रस्त्यावरच दारू प्यायची ‘सोय’ दुकानदार करून देत असल्याने याचा अर्थ असा की हे दुकानदार रस्त्यावरील दारू सेवनाला थेट प्रोत्साहन देत असल्याचे उघड होत आहे. हे सर्व प्रकार उच्चभ्रू सोसायट्यांच्या प्रवेशद्वाराजवळ सुरू असून, तेथे राहणाऱ्या महिलांवर विकृत टोळक्यांचे वागणे, शरीरविक्षेप, अश्लील इशारे या प्रकारामुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. एखादी दुर्दैवी घटना घडल्यावरच जाग येणार का ? असा थेट सवालच माजी नगरसेवक शैलेश पाटील यांनी उपस्थित केला आहे.
पोलिसांनीही तक्रारी मिळाल्यावर तातडीने लक्ष घालणे अपेक्षित आहे. अन्यथा या कृत्यांना पोलीस खात्याचा मूक पाठिंबा आहे का असा थेट पाठिंबा असल्याचे समजण्यात येईल असे शैलेश पाटील यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. सदर दिवा चौका जवळील रस्त्यावर दारू पिणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, दारू दुकानदारांकडून ‘पूरक साहित्य’ विक्रीवर बंदी आणावी. परिसरातील महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त नियमित असावा, दारू दुकानदारांना दुकानाबाहेर काय घडते याची जबाबदारी झटकता येणार नाही.
दारू दुकनादार ही या समाजाचेच घटक आहेत त्यामूळे केवळ पैसा कमावणे एवढ्याच उद्देशाने समोर सुरू असलेला नंगानाच दुर्लक्षीता येणार नाही त्यांनी हे तात्काळ थांवण्यासाठी स्वतःहून उपाययोजना करणे अपेक्षीत आहे. सदर प्रकार तात्काळ थांबवले गेले नाहीत तर तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करू व यास कारणीभूत पोलीस प्रशासन असेल असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. दिवा चौक हे दिव्याचे प्रवेशद्वार असून दिवा शहराबद्दल चूकीचा संदेश समाजात जावू नये असा इशाराच शैलेश पाटील यांनी मुंब्रा पोलिसांना दिलेल्या निवेदनातून कळविले आहे.