भारतीय रेल्वेने २२ ऑगस्टला एक प्रवेश परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेत गैरप्रकाराचा एक अनोखा प्रकार बडोद्यात उजेडात आला आहे. ज्या पद्धतीने हा गैरप्रकार झाला आहे ते पाहून अनेकांना धक्का बसला. बडोद्याच्या लक्ष्मीपुरा भागात एक तोतया उमेदवार खऱ्या उमेदवाराच्या जागी परीक्षा देताना आढळला. परीक्षा देण्यासाठी त्याने खऱ्या उमेदवाराच्या अंगठ्याची त्वचाच त्याच्या अंगठ्यावर चिकटवली. हे करण्यासाठी त्याने डिंकाचा वापर केला.
गुजरात पोलिसांनी खऱ्या आणि तोतया उमेदवाराला अटक केली आहे. दोघंही मूळचे बिहारचे आहेत.खऱ्या उमेदवाराने एका हॉट प्लेटवर त्याचा अंगठा ठेवला आणि त्वचा बाहेर काढली. नंतर त्याने ती त्वचा तोतया उमेदवाराच्या त्वचेवर चिकटवली. ही कल्पना यशस्वी झाली आणि तोतया उमेदवार परीक्षा केंद्रावर गेला.
तो कसाबसा त्या केंद्रावर गेला. मात्र तिथे फवारलेल्या हँड सॅनिटायझरने त्याचा पुढचा प्लॅन फसला. त्याचं असं झालं की त्या उमेदवाराने तीनदा सॅनिटायझरने हात धुतले, त्यामुळे ती त्वचा अंगठ्यापासून वेगळी झाली. जेव्हा पर्यवेक्षकांनी पुन्हा एकदा अंगठ्याचे ठसे घेतले तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला. बडोदा पोलिसांनी तोतया आणि खऱ्या उमेदवाराला अटक केली आहे. त्या दोघांनाही कोर्टात हजर केलं, त्यांना पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
बडोदा पोलिसांनी खऱ्या उमेदवाराची DNA टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. तोतया उमेदवाराकडून जप्त केलेली अंगठ्याची त्वचा Forensic and Scientific Laboratory (FSL) कडे पाठवली. बडोदा भागातील लक्ष्मीपुरा परिसरात अनंत ट्रेडर्स या परीक्षा केंद्रावर हा सगळा प्रकार उघडकीस आला. भारतीय रेल्वेतर्फे टीसीएस ही कंपनी ही परीक्षा घेत होती. एक तोतया उमेदवार परीक्षा देत असल्याचं कंपनीने लक्षात आणून दिलं. नंतर तक्रारीच्या आधारे बिहारच्या तरुणांना अटक झाली.
पोलिसांमध्ये दाखल केलेल्या तक्रारीनुसार टीसीएस कंपनीतर्फे अखिलेंद्र सिंग यांना पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं होतं. मनीषकुमार शंभूप्रसाद यांची पाळी आली तेव्हा अनेकदा प्रयत्न करूनही त्यांची पडताळणी होऊ शकली नाही. यामुळे संशय वाढला आणि जेव्हा अखिलेंद्र यांनी त्याचा अंगठा तपासला तेव्हा त्यांना प्रचंड धक्का बसला. मनीषकुमार यांच्या अंगठ्यावर त्वचा चिपकवली होती. मनीषकुमार याची चौकशी करण्यात आली तेव्हा तो राज्यगुरू गुप्ता यांच्या जागी परीक्षा देत होता
पोलिसांच्या मते मनीषप्रसाद याचं प्रवेशपत्र तपासण्यात आलं. तिथल्या कर्मचाऱ्यांनी योग्य स्कॅनिंगही केलं होतं. स्कॅनिंग झाल्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी एका लॅबमध्ये पाठवण्यात आलं. त्याआधी एका यंत्राद्वारे बोटांचे ठसे तपासण्यात आले. मनीषकुमार पहिल्या फेरीत पुढे जाण्यात यशस्वी झाला. जेव्हा त्याने दोन-तीनदा सॅनिटायझरने हात धुतले तेव्हा त्याच्या अंगठ्यावरची त्वचा निघाली. त्यावरून शंकेला अधिकच वाव मिळाला.
“मनीषकुमार वारंवार त्याच्या खिशात हात घालत होता. त्यामुळे शंका दाट आली आणि मग त्याच्या उजव्या अंगठ्यावर सॅनिटायझर फवारण्यात आलं. त्यामुळे त्याच्या अंगठ्यावरची त्वचा निघाली. जस्मिमकुमार गज्जर टीसीएसमध्ये काम करतात. त्यांनी मनीषकुमार आणि राज्यगुरू यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ४१९,४६४,४६५ आणि १२० या कलमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. राज्यगुरूने हॉटप्लेटवर अंगठा ठेवल्याने त्याच्या हाताला फोड आले. तरीही त्याने अंगठ्याची त्वचा काढली आणि फिंगर प्रिंट तयार केलं. यासाठी त्याने कोणत्याही तज्ज्ञ व्यक्तीची मदत घेतली नाही.