
सासवड पोलीस ठाण्यातील वादग्रस्त कर्मचाऱ्याचे अखेर निलंबन; नेमकं कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, २८ मार्च २०२५ रोजी सासवड पोलिसांनी बिंगो चक्री जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकला होता. यामध्ये जप्त केलेले सर्व साहित्य पोलिस ठाण्यात आणले. तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोड करून जप्त केलेले सर्व साहित्य परत दिले. स्टेशन डायरीमध्ये टीव्ही दुरुस्तीचे काम सुरू असल्याची नोंद करून तो विषय कायमचा संपवला. मात्र, त्यांनंतर संबंधित पोलिस हवालदार विजय जावळे याचे त्याच जुगाराच्या अड्ड्यावरील व्हिडीओ व्हायरल झाले. यामध्ये जावळे हे अड्ड्यावर आल्यानंतर मटका लावतात आणि मटका जिंकून आलेले पैसे घेवून जात आहेत. सदर सीसीटीव्ही फुटेज सर्वच समाज माध्यमावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले. त्यानंतर संबंधित कर्मचारी काही दिवस अनुपस्थित असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिस हवालदार जावळे याची भोर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाकडून चौकशी सुरु केली. दरम्यान, जावळे याचा कसुरी अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुरुवारी ११ डिसेंबर २०२५ रोजी पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी गैरवर्तनाचा ठपका ठेवत जावळे याच्या निलंबनाचे आदेश देवून मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिस अधिकाऱ्यांसह अनेकांचे निलंबन
एकमेकांचा काटा काढणे आणि जिरवण्यात सासवडचे पोलिस अत्यंत माहीर आहेत. आपल्या वाटेत येणाऱ्याचा काटा कसा काढायचा, याचे तंत्र त्यांना चांगले अवगत आहे. बेकायदेशीर धंद्यात मिळालेली मलई फक्त मलाच पाहिजे. केवळ याच एकमेव इर्षेतून मागील काही महिन्यांत अनेक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक तसेच काही पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. तर एका कर्मचाऱ्याने दारू पिवून मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून झालेल्या अपघातात एका व्यक्तीला जीव गमवावा लागला होता. विशेष म्हणजे अपघात झाल्यानंतर त्याला मदत करण्याऐवजी पळून जाण्यात धन्यता मानली. त्यामुळे त्याचेही निलंबन झाले. सर्वजण सध्या मुख्यालयात आहेत.
आणखी दोन ते तीन जण रडारवर
सासवड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यावरील निलंबनाची कारवाई अद्यापपर्यंत चालूच आहे. एवढेच नाही तर बेकायदेशीर धंद्यांना पाठबळ देणे, फिर्यादीस आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे, बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांना पोलीसी कारवाईची माहिती देवून सावध करणे अशा विविध कारणाने पोलिसांची प्रतिमा मलीन करण्यास हातभार लावणारे आणखी तीन ते चार कर्मचारी पोलीस ठाण्यात अद्यापही कार्यरत असून, अनेकांच्या रडारवर आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत त्यांच्यावर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवरील निलंबनाची मालिका कधी थांबणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.