
पुरंदरमधील रस्त्यांवर गतिरोधकांची गरज; सायकल स्पर्धेनंतर वाहनांचा वेग वाढला
सासवड-सुपे रस्त्यावर दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा अपघात झाल्याची घटना नुकतीच घडली. सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही. यामध्ये दोन्ही वाहने वेगात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वाहनांना ब्रेक लागण्यासाठी स्पीड ब्रेकरची (गतिरोधक) आवश्यकता निर्माण झाली आहे.
पुणे ग्रँड टूर- २०२६ स्पर्धेच्या माध्यमातून पुरंदर तालुक्याचा इतिहास, भौगोलिक इतिहास जगासमोर पोहोचणार असल्याने रस्ते दर्जेदार होणे आवश्यक होते. त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विशेष लक्ष घातले होते. विविध कंपन्यांच्या माध्यामातून जवळपास १३२ कोटी रुपये खर्च करून स्पर्धेच्या मार्गावरील सर्व रस्ते दर्जेदार करण्यात आले आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजवले असून साईड पट्टे, दिशादर्शक फलक, पारदर्शक दिवे, विविध सूचना फलक लावले असून सर्व रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यामुळेच स्पर्धकाना रस्त्यावरून सायकली चालवताना कोणताही त्रास जाणवला नाही. विशेष म्हणजे स्पर्धेतील बहुतेक रस्ते घाट परिसरातील असूनही दर्जेदार रस्त्यांमुळे स्पर्धा सुरळीत पार पडल्या.
स्पर्धा नुकत्याच झाल्यामुळे सर्व रस्ते नियमित वाहतुकीसाठी पुन्हा खुले झाले आहेत. दरम्यान ग्रामीण भागातील आणि घाट परिसरातीलही सर्वच रस्ते दर्जेदार आणि खड्डे मुक्त आणि रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे गतिरोधक नाहीत. परिणामी रस्त्यावरून वाहने चालविताना वाहनांना कोणत्याही प्रकारचे नियंत्रण राहिलेले नाही. वाहनांना कोणतेही नियंत्रण नसल्याने अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. याचाच अनुभव लगेच आला असून सासवड सुपे रस्त्यावर एक दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा अपघात घडला आहे. तसेच दोन्ही वाहनांचे वेग अनियंत्रित होते मात्र सुदैवाने कोणतीही मोठी घटना घडली नाही असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
स्पर्धेमुळे काढले होते सर्व गतिरोधक
हडपसरवरून सासवडला येताना सासवड हद्दीत चंदन टेकडी, बोरावके मळा समोर, वाघिरे कॉलेज गेट, एसटी बस स्थानक समोर, पोलीस स्टेशन समोर, पीएमपीएमएल बस स्थानक, वाघापूर रोड लगत आणि जेजुरी नाका आदी ठिकाणी गतिरोधक बसविण्याची गरज आहे. विशेष म्हणजे हडपसर करून सासवडला येताना आणि जेजुरीकडून हडपसरकडे जात असताना सासवड हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा वेग प्रचंड असल्याने नेहमीच अपघात होत होते. मात्र अपघात टाळण्यासाठी स्पीड ब्रेकर बसविले होते. सायकल स्पर्धेमुळे सर्व स्पीड ब्रेकर काढले होते. ते सर्व स्पीड ब्रेकर पुन्हा बसविण्याची गरज आहे.
रस्त्यालगत नागरिकांची सतत वर्दळ
पुरंदरच्या ग्रामीण भागातील रस्त्यालगत नागरिकांची घरे असून, रस्ताला लागुनच विद्यालय, शाळा, दवाखाना, दुकाने असल्याने नागरिकाची सतत वर्दळ असते. तसेच वाहनांना वेग प्रचंड असल्याने यापूर्वी कित्येकवेळा मोठमोठे अपघात घडले आहेत. भविष्यात अपघात टाळण्यासाठी ग्रामीण भागातील रस्त्यावर देखील अशाच प्रकारचे स्पीड ब्रेकर लावण्यासाठी रस्ते बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.