तासगावातील 'त्या' खूनाचा झाला उलगडा; कारणही आलं समोर
तासगाव : तासगाव तालुक्यातील डोर्ली फाटा येथील लष्करातील निवृत्त सुभेदार गणपती शिंदे यांचा डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केल्याप्रकरणी वैष्णव विठ्ठल पाटील (वय १९, रा. बलगवडे, ता. तासगाव, जि. सांगली) यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. हा खून मृताची गाडी विकून पैसे मिळवण्यासाठी व गाडी परत मागू नये म्हणून केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, डोर्ली फाटा येथे राहत असलेले गणपती धोंडीराम शिंदे (वय ६५) यांचा अज्ञाताने घरात घुसून डोक्यात व कपाळावर लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी करुन खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री घडली होती. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी भेट देवून या गंभीर गुन्ह्याची तात्काळ उकल करण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व तासगाव पोलिसांना सूचना केल्या होत्या. समांतर तपासादरम्यान, घटनास्थळाचे निरीक्षण व इतर गोपनीय माहितीच्या आधारे संशयित वैष्णव विठ्ठल पाटील याच्या हालचालीबाबत संशय निर्माण झाल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके सोलापुर व धाराशिव या जिल्ह्यात रवाना होवून तपास करीत असताना पोलिसांच्या पथकास संशयित वैष्णव विठ्ठल पाटील हा मौजे देवगाव (ता. परांडा, जि. उस्मानाबाद) येथे असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले.
कार विक्रीचे पैसे मागू नये यासाठी केला खून
पोलिसांनी वैष्णवकडे कसून चौकशी केली असता त्यांने मृताची कार विकून पैसे मिळवायचे व त्यांनी ती गाडी परत मागु नये म्हणून खुन केल्याची कबुली दिली. पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे, सपोनि पंकज पवार, रूपाली बोबडे, पोलीस अंमलदार सागर टिंगरे, दरिबा बंडगर अरुण पाटील, सतीश माने, पोलीस नाईक, प्रकाश पाटील, सोमनाथ गुंडे, सतीश नलावडे, सुरज थोरात, अभिजीत ठाणेकर, विनायक सुतार, रोहन गस्ते, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, अमरसिंह सूर्यवंशी, सयाजी पाटील, प्रशांत चव्हाण, सुहास खुबीकर, विवेक यादव, विठ्ठल सानप यांनी ही कारवाई केली. अधिक पुढील तपास तासगाव पोलीस करीत आहेत.