पुण्यात मोठा दरोडा टाकण्याचा प्लॅन फसला; आरोपींना पोलिसांनी केली अटक
पुणे : कात्रज परिसरातील एका सराफी पेढीवर भरवर्दळीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या अल्पवयीन मुलांच्या टोळीला पोलिसांनी पकडले. भारती विद्यापीठ पोलिसांनी सतर्कतेने घटनेच्या काही तास आधीच टोळी पकडल्याने मोठी घटना देखील टळली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात १७ व १८ वर्षीय सहा अल्पवयीन मुलांवर दरोड्याच्या प्रयत्नासह इतर कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार चेतन गोरे यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुक तसेच शनिवारी मतमोजणी प्रक्रिया असल्याने पोलिसांकडून शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भारती विद्यापीठ पोलीस कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हद्दीत गस्त घालत होते. यादरम्यान, कात्रजमधील एका सराफी पेडीवर काही जणांची टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना समजली. त्यानूसार, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व त्यांच्या पथकाने या भागात सापळा रचला.
हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांची मोठी कारवाई; घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या
तसेच, काही वेळातच दरोडा टाकणाऱ्या टोळीवर छापा मारला. मात्र, टोळीतील चौघे तेथून पळ काढण्यात यशस्वी झाले. तर, दोघे पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्याकडून घातक शस्त्रे व दुचाकी मिळाली. चौकशी केली असता टोळके येथील एका सराफी दुकानात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे समजले. त्यांच्यावर गुन्हा नोंद केला असून, सखोल चौकशी केली जात आहे. दरम्यान, त्यावेळी ६ जणांची ही टोळीतील एका अल्पवयीन मुलावर खूनाचा गुन्हा दाखल आहे. उपनिरीक्षक निलेश मोकाशी हे अधिक तपास करत आहेत.
पुण्यात नागरिकांना लुटले
पुणे शहरात एकट्या पादचारी नागरिकांना भावनिक करून त्यांना लुटण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पुन्हा दोन घटना घडल्या असून, एका ज्येष्ठ महिलेसह दोघांजवळील किंमती ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. सिंहगड रस्ता आणि कोंढवा भागात या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात ६२ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार या गणेशमळा परिसरात राहायला आहेत. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील नवशा मारुती मंदिर परिसरातून त्या जात होत्या. त्यावेळी दोन चोरटे त्यांच्याजवळ आले. महिलांना मोफत साडी आणि पैशांचे वाटप करण्यात येत असल्याची बतावणी केली. तुमच्याकडील दागिने आणि रोकड काढून पिशवीत ठेवा, असे सांगितले. नंतर चोरट्यांनी महिलेला बोलण्यात गुंतवत त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून पिशवीतील दागिने आणि रोकड असा ५५ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.