
पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; 'या' भागातील घरे फोडून लाखोंचा ऐवज चोरला
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज वेगवेगळ्या भागात चोरटे घरे फोडून नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता पुण्यातून चोरीच्या काही घटना उघडकीस आल्या आहेत. पुण्यात चोरट्यांनी वेगवेगळ्या भागांतील सदनिकेचे कुलूप तोडून ३२ लाख रुपयांचा ऐवज लांबविला आहे. धनकवडी, वडगाव शेरी, हडपसर भागात चोरीच्या घटना घडल्या आहेत.
धनकवडीतील मंदार सोसायटीतील एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी आठ लाख ६९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मंदार सोसायटीतील अबोली इमारतीत राहायला आहेत. शुक्रवारी (७ नोव्हेंबर) सकाळी दहाच्या सुमारास त्या सदनिका बंद करून कामानिमित्त बाहेर पडल्या. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. चोरट्यांनी देवघरातील देव्हाऱ्याच्या एका कप्प्यात ठेवलेल्या डब्यातील आठ लाख ६९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. दुपारी एकच्या सुमारास त्या घरी परतल्या. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे तपास करत आहेत.
हडपसरमधील रामटेकडी परिसरात एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील एक लाख २१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. याबाबत एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला बुधवारी (५ नोव्हेंबर) गुरु नानक जयंतीनिमित्त गुरुद्वारात दर्शनासाठी गेल्या होत्या. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून एक लाख २१ हजार १०० रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक तपास करत आहेत.
हडपसरमधील गोसावी वस्ती परिसरात घरफोडीची आणखी एक घटना घडली. गोसावी वस्ती परिसरात असलेल्या एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड आणि सोन्याचे दागिने असा २१ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे तपास करत आहेत.
पानपट्टीतून सिगारेट चोरी
वडगाव शेरी भागातील एका पानपट्टीचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी ८० हजार रुपयांची सिगारेटची पाकिटे चोरून नेली. याबाबत एकाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वडगाव शेरीतील यशवंत पान शाॅप आहे. चोरट्यांनी पानपट्टीचा लोखंडी दरवाजा उचकटला. पानपट्टीत ठेवलेली सिगारेटची पाकिटे चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस कर्मचारी कोळेकर तपास करत आहेत.
औषध विक्री दुकानातून रोकड चोरी
धनकवडीतील तीन हत्ती चौक परिसरात असलेल्या औषध विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील ३९ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत एका औषध विक्रेत्याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराचे तीन हत्ती चौकात औषध विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचा दरवाजा उचकटून गल्ल्यातील रोकड लांबविल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस उपनिरीक्षक कर्चे तपास करत आहेत.