गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक; तब्बल 40 लाखांना घातला गंडा
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुक केल्यास चांगला नफा देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेची ४० लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ६४ वर्षीय ज्येष्ठ महिलेने तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार कोंढवा भागात राहतात. १६ फेब्रुवारी रोजी चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्यांना दाखविले. महिलेने सुरुवातीला काही रक्कम गुंतविली. या रकमेवर त्यांना चांगला परतावा देण्यात आला. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला.
चोरट्यांनी त्यांना आणखी रकम गुंतविण्यास सांगितले. चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यावर गेल्या ५ महिन्यात महिलेने वेळोवेळी ४० लाख २० हजार रुपये जमा केले. रक्कम गुंतविल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही, तसेच त्यांना मुद्दल दिली नाही. त्यांनी चोरट्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही. तेव्हा त्यांना फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. नंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत.
तरुणाची १८ लाखांची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने कोथरूडमधील तरुणाची सायबर चोरट्यांनी १८ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत ३९ वर्षीय तरुणाने कोथरूड पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सायबर चोरट्यांनी त्याला शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले होते. रक्कम गुंतविल्यानंतर चोरट्यांनी त्याला परतावा दिला नाही. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम तपास करत आहेत.