
कुत्र्याला पाहून इलेक्ट्रिशियन कामगार घाबरला; पळताना तिसऱ्या मजल्यावरून पडला अन्...
रमेश गायकवाड (वय ४५, रा. मंगळवार पेठ) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी कुत्र्याचा मालक सिद्धार्थ दिलीप कांबळे (वय २४, रा. सिद्धिविनायक अपार्टमेंट, कसबा पेठ) याच्याविरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रमेश यांची पत्नी जया गायकवाड (वय ४०) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना १ ऑक्टोंबर रोजी घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवार पेठेत रमेश गायकवाड राहतात. ते मुळचे यवत तालुक्यातील आहेत. ते इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात. खासगी कामे देखील ते करतात. दरम्यान, १ ऑक्टोबर रोजी ते सहकाऱ्यासह कसबा पेठेतील सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर वायरिंगचे काम करण्यासाठी आलेले होते. दुरुस्तीचे काम करत असताना चौथ्या मजल्यावरून सिद्धार्थ कांबळे यांचा जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा अचानक त्यांच्या दिशेने धावत आला.
कुत्रा धावत आल्याने रमेश हे घाबरले आणि त्यांनी पळ काढला. ते शिड्यावरून खाली पळत येत असताना ते शिड्यांच्या डक्टमधून खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर रमेश यांच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीवरून सिद्धार्थ कांबळे याच्याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गोरे करत आहेत.