एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल 'इतक्या' लाखांना घातला गंडा
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ गातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. असातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एटीएममधून रोकड काढण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाकडे मदतीचा बहाणा करुन चोरट्यांनी १ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना खडकी बाजार परिसरात घडली आहे. याबाबत ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक बोपोडी भागात राहायला आहेत. ते शुक्रवारी (९ मे) खडकी बाजार परिसरात कामानिमित्त आले होते. खडकी बाजारातील एका बँकेच्या एटीएममध्ये ते पैसे काढण्यासाठी गेले. एटीएमच्या बाहेर २० ते २५ वर्षांचा चोरटा पाळत ठेऊन थांबला होता. ज्येष्ठाच्या पाठोपाठ चोरटा एटीएममध्ये शिरला. ज्येष्ठाने एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पैसे बाहेर पडले नाहीत. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना मदत करण्याचा बहाणा केला. पैसे काढून देतो, असे सांगून त्यांच्याकडून एटीएम कार्ड, तसेच सांकेतिक शब्द (पासवर्ड) घेतला. चोरट्याने पैसे काढण्यासाठी दुसरे एटीएम कार्ड वापरले. पैसे बाहेर पडले नाहीत. एटीएममध्ये तांत्रिक बिघाड असल्याची बतावणी चोरट्याने केली. त्यानंतर चोरट्याने पैसे चोरुन नेले.