ज्येष्ठ महिलेचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यांना अटक; 60 हजारांचे सोन्याचे दागिने
पुणे : रस्त्यावरून पायी जात असलेल्या ज्येष्ठ महिलेकडील दागिने हिसकावून पसार झालेल्या चोरट्यांना सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली. चोरट्यांनी नव्हे भागातील झील कॉलेज चौकात पादचारी महिलेकडील दागिने हिसकावून नेल्याची घटना घडली होती. चोरट्यांकडून ६० हजारांचे सोन्याचे दागिने आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राहुलकुमार शामकुमार (वय ३३), गोविंदाकुमार ओमप्रकाश (वय ३५, दोघे सध्या रा. गणेश हाईट्स, मतेनगर, अंबाईदरा, धायरी) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार ज्येष्ठ महिला नन्हे भागात राहायला आहेत. त्या ४ ऑगस्ट रोजी नन्हे भागातील झील कॉलेज चौकातून निघाल्या होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार चोरटे राहुलकुमार आणि गोविंदाकुमार यांनी पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेले होते.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी नन्हे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले.
हेदेखील वाचा : Bhandara Crime News : भंडारा हादरलं! दोन गटात अस्तित्वाच्या लढाईतून धारधार शस्त्राने दोघांची हत्या
तपासात मिळालेल्या माहितीनुसार, दोघे जण धायरीतील अंबाईदरा परिसरात थांबल्याची माहिती उपनिरीक्षक भांडवलकर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. राहुलकुमार, गोविंदाकुमार यांनी दागिने चोरल्याची कबुली दिली. दोघांनी दागिने हिसाकाविण्याचे आणखी किती गुन्हे केले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांच्यासह त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.