पुण्यात चोरांचा धुमाकूळ! दोनच दिवसात अनेक ठिकाणी घरफोड्या; लाखोंचा ऐवज चोरला
पुणे : राज्यासह देशभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज चोरटे बंद घरे फोडून लाखो रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारत आहेत. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहरात दोन दिवसात चोरट्यांनी कोंढवा, चंदननगर, मुंढवा तसेच चतु:श्रृंगी परिसरातील बंद फ्लॅट फोडले आहेत. चार घरफोडीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी जवळपास सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
कोंढव्यातील भागोदयनगर परिसरात केपीएच हाईट्स सोसायटीतील बंद फ्लॅट फोडत चोरट्यांनी कपाटातील १ लाख ५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लांबविली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक थोरात तपास करत आहेत.
चंदननगर भागातील खराडीत सद्गगुरु सोसायटीतील फ्लॅट फोडला आहे. चोरट्यांनी २६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. याप्रकरणी ४७ वर्षीय व्यक्तीने चंदननगर पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, चोरट्यांनी तक्रारदाराच्या बंद फ्लॅटचे कुलूप १ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री तोडले. त्यांच्या पत्नीने पिशवीत ठेवलेले सोन्याचे दागिने लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक ढावरे तपास करत आहेत.
शनिवारी सकाळी आणखी दोन घटना उघडकीस आल्या आहेत. मुंढवा परिसरातील ब्रह्माबाग सोसायटीतील बंद फ्लॅट फोडत कारची चावी चोरली. नंतर पार्क केलेली कार घेऊन चोरटे पसार झाले आहेत. याप्रकरणी ५५ वर्षीय व्यक्तीच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंदवला आहे. दुसरी घटना दिपबंगला चौकातील प्रज्ञा एम्पायर येथील मिठाईचे दुकान फोडण्यात आले आहे. चोरट्यांनी येथून ३५ हजार रुपयांची रोकड चोरून पोबारा केला आहे. ऐन चौकातील दुकान फोडण्यात आल्याने व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा : पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…